नांदेड-परभणी-हिंगोली असे तीन जिल्हे जोडले
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड आणि लातूर या दोन जिल्ह्यांसाठी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग हे नवीन कार्यालय सुरू करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने आज 3 नोव्हेंबर रोजी जारी केला आहे. या निर्णयावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव विक्रम ढमाळ यांची स्वाक्षरी आहे. नांदेड प्रादेशिक विभागात तीन जिल्हे जोडण्यात आले आहेत.
मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नांदेड या कार्यालयाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड आणि नांदेड, भोकर, देगलूर, परभणी आणि हिंगोली ही विभागीय कार्यालय काम करतील. अशा प्रकारे नांदेडच्या मुख्य अभियंता कार्यालयाशी तीन जिल्हे जोडण्यात आले आहेत. मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग लातूर या कार्यालयाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम मंडळ लातूर आणि लातूर-1, लातूर-2 आणि निलंगा ही तीन विभागीय कार्यालये काम करतील.
या कार्यालयाअंतर्गत आवश्यक असलेल्या अधिक पदांचे समायोजन करण्यासाठी मुख्य अभियंता प्रादेशिक विभाग औरंगाबाद यांच्याशी सल्लामसलत करून करता येतील. या नवीन कार्यालयामध्ये नांदेडच्या कार्यालयाचे प्रमुख व नियंत्रक अधिकारी स्वत: मुख्य अभियंता असतील. तसेच लातूरच्या कार्यालयाचे प्रमुख पद अधिक्षक अभियंता सा.बां.लातूर यांच्याकडे देण्यात आले आहे. या दोन कार्यालयांमुळे कांही मंजुरी मिळविण्यासाठी औरंगाबाद येथे संचिका पाठविण्याचा त्रास वाचणार आहे. शासनाने हा निर्णय संकेतांक क्रमांक 202111031720437418 नुसार शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.