नांदेड(प्रतिनिधी)-सध्या दिवाळी असल्याने सर्व बाजार फुललेले आहेत. मागील वर्षाची दिवाळी जनतेला साजरी करता आली नाही म्हणून यंदाच्या दिवाळीत भरमसाठ गर्दी आहे. बाजार फुलले म्हणजे बॅंकेतून पैसे काढणे आणि बॅंकेत पैसे काढणे हा भाग आलाच. शिवाजीनगर भागातील एसबीआय बॅंकेने ग्राहक केंद्राचे भले व्हावे म्हणून आपल्या पैसे भरण्याच्या मशीन बंद ठेवल्या आहेत. आपल्याच खात्यात पैसे भरायचे असतील किंवा काढायचे असतील तर त्यासाठी ग्राहकांना सेवा कर द्यावा लागत आहे.
भारतात बॅंका सुरू झाल्या तेंव्हा आपले पैसे सुखरुप ठेवण्याची मुभा ग्राहकांना मिळाली. त्याचा फायदाही झाला. बॅंकेत पैसे जमा केल्यानंतर त्यावर व्याज मिळू लागले. सोबतच सुरूवातीच्या काळात बॅंका सुरू असतील तेंव्हा पैसे काढता येत होते. पुढे यात प्रगती झाली आणि एटीएम मशीन आल्या. त्यामुळे कोणत्याही क्षणी आपल्या खात्यातील पैसे काढण्याची सुविधा ग्राहकांना मिळाली. पुढे त्यावर कांही निर्बंध आले. अमुक एवढे व्यवहार केल्यानंतर ग्राहकांना सेवा कर लागला. याही पुढे बॅंकांनी ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) तयार केले आणि तेथे मात्र ग्राहकांना आपले पैसे भरायचे असतील किंवा काढयचे असतील तर दर दहा हजारी 100 रुपये लागू लागले. बॅंकांची गर्दी वाढली त्या तुलनेत ग्राहक सेवा वाढवल्या नाहीत. पण बाहेरच्या मंडळींना ग्राहक सेवा केंद्र देवून त्यांना रोजगार मिळवून दिला हे मात्र खरे.
बॅंकांनी जनतेच्या सोयीसाठी तयार केलेल्या या ग्राहक सेवा केंद्रांमध्ये सुध्दा आता रांगेत उभे राहुन आपले पैसे भरणे आपल्या खात्यात भरणे आणि पैसे काढणे या कामासाठी वेळ लागतच आहे. सोबत सेवा कर वेगळा द्यावा लागत आहे. एसबीआय बॅंक शिवाजीनगर यांनी ग्राहकांनी पैसे भरण्यासाठी दोन मशिन बॅंकेच्या बाहेर लावल्या आहेत. पैसे काढण्यासाठी दोन मशीन लावण्यात आल्या आहेत. पण या यापैकी पैसे भरण्याच्या मशीन बंद असल्यामुळे ग्राहकांची कुचंबना सुरू झाली आहे. आपले पैसे आपल्याच खात्यात भरण्यासाठी आता ग्राहकांना ग्राहक सेवा केंद्रावर दर दहा हजारी 100 रुपये मोजावे लागत आहेत. कोणत्याही शासकीय योजनेत सर्वसामान्य माणसाची पिळवणूक होते त्यातीलच हा प्रकार आहे.
शिवाजीनगर येथील एसबीआय बॅंकेसमोरील पैसे भरण्याच्या मशीन बंद; ग्राहकांची कुचंबना