पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स गाड्यांचा “धंदा’ 300 पटीचा

ट्रॅव्हल्स गाड्यांच्या दरावर कोणाचेही नियंत्रण नाही
नांदेड(प्रतिनिधी)- दिवाळी आली कि ट्रॅव्हल्स मालक आणि चालक यांची दिवाळी सर्वात छान होत असते. यंदा सुध्दा पुण्याला जाणाऱ्या-येणाऱ्या ट्रॅव्हल्स गाड्यांचे दर सरासरी दर माणसासाठी 2500 रुपये आहे. नियमित दराप्रमाणे मोजले तर 300 टक्केचा हा प्रकार आहे. या दर वाढीवर अर्थात पलंगावर असलेल्या रुग्णाला मिळणारी उपचार पध्दती अशीच असते. तरीपण यावर कोणाचे नियंत्रण नसते यापेक्षा भारतीय लोकशाहीचे दुर्देव दुसरे काय?
महाराष्ट्रात पुणे हे शहर शिक्षणाची पंढरी म्हणून प्रसिध्द आहे. यामुळे पुण्याचा ईतिहास हा पुर्वीपासूनच सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला आहे. पुढे अनेक जागतिक कंपन्यांचे कार्यालय पुण्यामध्ये सुरू झाले आणि पुण्याच्या महत्वात आणखीनच भर पडली. पुण्याला शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी महाराष्ट्रातून भरपूर मंडळी जाणे-येणे करते. त्यात नांदेड जिल्हा सुध्दा असा आहे की, बहुतांश मंडळी पुण्यात कार्यरत आहे. भारतात दिवाळी या सणाचे महत्व सर्वश्रुत आहे. त्यासाठी कितीही दुर असणारी मंडळी आपल्या मुळ घरी या सणाला येतेच आणि सण संपताच परत जाते. हा प्रघात अनेक वर्षांपासून सुरू आहे. आलेल्या संधीचे सोने करणे हा वाक प्रचार आजच अस्तित्वात आला नाही. तर तो अर्वाचिन काळापासून रुढ आहे. आलेल्या संधीचे सोने करणे ही बाब सुध्दा खुप महत्वपूर्ण आहे. कारण संधीचे सोने करणाऱ्यांचे नशीब लवकर बदलते असे म्हणतात. पण फक्त पैसे कमावण्यासाठी आलेल्या संधीचे सोने करावे असा अर्थ या वाकप्रचारात नाही.
पण जेंव्हापासून ट्रॅव्हल्स गाड्या सुरू झाल्या. त्यानंतर पैसे कमावण्यासाठी संधीचे सोने करणे हा प्रकार पुढे आला. सुरूवातीच्या काळात ट्रॅव्हल्सवाल्यांना सुध्दा याची जाण नव्हती. पण जीवनातील प्रसंग सर्व कांही शिकवतात असेच ट्रॅव्हल्सवालेपण शिकले. दिवाळीच्या काळात नांदेडला येणाऱ्यांची गर्दी पाहता. ट्रॅव्हल्स तिकिट वाढत राहतात. दिवाळीचा भाऊबीज हा सण झाला की परत जाणाऱ्यांची गर्दी होते आणि तेंव्हा सुध्दा ट्रॅव्हल्सचे दर उच्च स्तरावर असतात. आज ऑनलाईन पाहिलेल्या नांदेड-पुणे ट्रॅव्हल्स गाडीच्या तिकिटाचे दर 2500 रुपये आहे. ज्यांना जाण्याची गरज आहे ते हे पैसे देवून जातातच कारण सध्या एस.टी.गाड्या बंद आहेत. पुण्याला जाण्यासाठी दोन रेल्वे गाड्या आहेत. त्यांचे आजचे वेटींग 150 च्या वर आहे. मग परत जाणार कसे. ट्रॅव्हल्सवाल्यांचा हा मनमानी दर नियमित दराच्या मानाने 300 पटीचा आहे. ट्रॅव्हल्सवाल्यांना दिवाळीच्या काळात डिझेल महाग मिळते काय?, त्यांचे चालक जास्त पैसे घेतात काय? या प्रश्नांची उत्तरे शोधली असता ती सर्व नकारार्थी आहेत. अनेक ट्रॅव्हल्स गाड्या ज्यांनी कधी नांदेड पाहिले नाही, त्या गाडीतील चालकांना नांदेडचा रस्ता माहित नाही अशा गाड्या सुध्दा नांदेडला येतात कारण 300 पटीचा धंदा कोणाला आवडणार नाही. ट्रॅव्हल्सवाल्यांनी कांही पैसे जास्त घेतले तर प्रवासी सुध्दा अडचण करणार नाही कारण त्यांचे येणे-जाणे महत्वपूर्ण आहे.पण 300 पटीचा धंदा नक्की अन्याय आहे. ट्रॅव्हल्सवाल्यांवर कोणत्याही प्रकारचे दर नियंत्रण नसल्यामुळे असा हा प्रकार घडतो आणि त्यांची दिवाळी नेहमीच साजरी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *