1 लाख 65 हजारांच्या चार दुचाकी गाड्या चोरी
नांदेड(प्रतिनिधी)-वसंतनगरमधील एका फोटो ग्राफरला दिवाळी महागात पडली. 3 लाख 15 हजार रुपयांचे त्याचे साहित्य चोरीला गेले आहे. शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी गाडी चोरीला गेली आहे. चोरीला गेलेल्या एकूण ऐवजाची किंमत 4 लाख 80 हजार रुपये आहे.
राहुल रमेश देशमुख यांचा वसंतनगर भागात फाईन आर्ट डिजिटल स्टुडिओ आहे. 5 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता त्यांनी आपल्या दुकानात लक्ष्मी पुजा केली आणि आपल्या फोटो ग्राफीचे सर्व साहित्य त्या पुजेत ठेवले होते. कॅमेरे, लेन्स, फ्लॅश आणि मॉनीटर असे हे साहित्य. 6 नोव्हेंबरच्या सकाळी 5 वाजता त्यांचे दुकान फोडल्याची माहिती प्राप्त झाली. तपासणी केली असता कोणी तरी चोरट्यांनी शर्टरच्या दोन्ही बाजूचे कडीकोंडे तोडून त्यातून महागडे फोटोग्राफी साहित्य चोरून नेले होते. या ऐवजाची एकूण किंमत 3 लाख 15 हजार रुपये आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक रोडे यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.
केशव दत्ता सूर्यवंशी यांची 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एल.8940 ही लोकमनवार मेडीकल शेजारून दि.3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता चोरीला गेली. विठ्ठल व्यंकटराव वडजे यांची 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 7976 ही 1 नोव्हेंबर रोजी रात्री मगनपूरा भागातून चोरीला गेली. शिवाजीनगर पोलीसांनी हे दोन्ही गुन्हे दाखल केले असून पोलीस अंमलदार वाघमारे अधिक तपास करीत आहेत. संदीप खोब्राजी निखाते यांची 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.यु.0209 ही 1-2 नोव्हेंबरच्या रात्री नागसेननगर भागातून चोरीला गेली आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार ढवळे अधिक तपास करीत आहेत.
शिवाजी बापूराव पुयड यांची 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 यु.4579 ही 3 नोव्हेंबर रोजी दुपारी हबीब टॉकीजजवळील सना ड्रेसेस समोरून चोरीला गेली आहे. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे. या सर्व चोरी प्रकारामध्ये एकूण 4 लाख 80 हजारांचा ऐवज लंपास झाला आहे.
फोटोग्राफरला दिवाळी महागात पडली; 3 लाख 15 हजारांचे साहित्य चोरीला गेले