धुंदी कळ्यांना, मी जलवंती मी फुलवंती, निसर्ग राजा, गं साजनी, माझ्या भावाला माझी माया कळू दे, या व असंख्य गितांनी दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाची सांगता

नांदेड,(प्रतिनिधी)-निसर्ग राजा ऐक सांगतो, धुंदी कळ्यांना, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, एक लाजरा न साजरा मुखडा या व अन्य ओठावरच्या गाजलेल्या गाण्यांनी जगदीश खेबुडकर यांच्या गितावर आधारीत धुंदी कळ्यांना हा कार्यक्रम नांदेडच्या रसिक, प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. मुंबईच्या निनाद अजगावकर आणि मुंबईच्याच शिल्पा मालंडकर या दोन प्रख्यात गायकांनी या कार्यक्रमात चांगलीच रंगत आणून रसिक, प्रेक्षकांना भारावून सोडले.
                             जिल्हा प्रशासन नांदेड, नांदेड मनपा, गुरुव्दारा बोर्ड व नागरी संस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी पहाटची या कार्यक्रमाने सांगता झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, प्रख्यात उद्योजक राम तुप्तेवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.दिवाळी पहाट अंतर्गत कालची सकाळ वेगवेगळ्या ओठावरच्या व गाजलेल्या गाण्यांनी गाजली. जगदीश खेबुडकर यांच्या गितांची ही बहारदार मैफल मुंबई व नांदेडच्या कलावंतांनी गाजवून सोडली. प्रख्यात निवेदक अ‍ॅड. गजानन पिंपरखेडे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची निर्मिती व दिग्दर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शिल्पा मालंडकर हिच्या देवाचा ही देव करतो या गिताने झाली. त्यानंतर तिने गायिलेल्या ऐरणीच्या देवा तुला, तुम्हावर केली मी मर्जी बहाल या गितांनी चांगलीच रंगत आणली. मुंबईचे प्रख्यात गायक निनाद अजगावकर यांनी या मैफलीत चांगलीच बहार आणली. सुरुवातीला त्यांनी एक तारी संगे एकरुप झालो हे भक्तीगीत सादर करुन रसिक, प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर त्यांनी व शिल्पा यांनी गायिलेल्या द्वंद गितांनी रसिक, प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या. या मिलनी रंगली, धुंदी कळ्यांना, एक लाजरा न साजरा मुखडा, मी जलवंती मी फुलवंती ही द्वंद्व गिते चांगलीच बहरली. नांदेडच्या गायिका रागीनी जोशी हिने गायिलेल्या बाई बाई मन मोराचा या गितानेही रसिक, प्रेक्षकांची दाद मिळविली. प्रख्यात गायक श्रीरंग चिंतेवार आणि रागीनी जोशी यांनी गायिलेल्या निसर्ग राजा ऐक सांगतो या गिताने रसिकांचा ठेका मिळविला. रागेश्री जोशी हिने गायिलेल्या ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर तसेच भाऊबिजेच्या निमित्ताने सादर केलेल्या माझ्या भावाला माझी माया कळू दे, या गितानेही रसिकांची मने जिंकली. श्रीरंग चिंतेवार आणि रागेश्री जोशी यांनी गायिलेल्या अगं नाच नाच राधे उधळू या रंग या गितानेही बहार आणली. विजय जोशी आणि श्रीरंग चिंतेवार यांनी सुरुवातीला विठू माऊली तू माऊली जगाची या भक्तीगिताने रसिकांना पांडूरंग पांडूरंगाच्या नावावर भक्ती रसात न्हाऊन टाकले. तर विजय जोशी यांनी गायिलेल्या दाम करी काम या चित्रपटाचे बारा डोळ्याने पाप सारी, नारायण बघतो या गिताने रसिक, प्रेक्षकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या. पहाडी आवाजाची वेगळी कलाकृती त्यांनी सादर करत सरतेशेवटी कशी नशीबानं थट्टा आज मांडली हे गीत सादर केले. या कार्यक्रमाला संगीतसाथ राजू जगधने, सिध्दोधन कदम, शेख नईम, रतन चित्ते, सुभाष जोगदंड यांनी केले. या कार्यक्रमाचे बहारदार निवेदन अ‍ॅड.गजानन पिंपरखेडे यांनी करताना जगदीश खेबुडकर यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या घटनांना तसेच त्यांच्या गितांना उजाळा देत अनेक प्रसंग उभे केले.
जिल्हा प्रशासन, मनपा नांदेड, गुरुव्दारा बोर्ड, नागरी सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे व या समितीचे सर्व सदस्य यांनी या तीन दिवशीय दिवाळी पहाट-आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करुन नांदेडकरांना आगळीवेगळी भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *