वास्तव न्युज लाईव्हला 176 दिवसांत 2 लाखांपेक्षा जास्त वाचकांची पसंती

रामप्रसाद खंडेलवाल
नांदेड-आज दि.09 नोव्हेंबर, ज्ञान पंचमीच्या दिवशी वास्तव न्युज लाईव्हला 173 दिवस पुर्ण झाले आहेत. या 173 दिवसांमध्ये वाचकांनी आमच्या लिखाणाला दिलेली पसंती आज 2 लाखांचा आकडा पार झाल्यानंतर स्पष्टपणे जाणवते. वाचकांनी आमच्या लिखाणाला दिलेल्या पसंतीसाठी आम्ही त्यांचे ऋणी आहोत. याही पुढे आमच्या मृत्यूपर्यंत सत्य मांडल्याशिवाय गप्प राहणार नाही याची ग्वाही आम्ही आमच्या वाचकांना देवू इच्छीतो. ईतिहासाच्या प्रवासात अनेक अडचणी पार करतांना आलेले अनुभव आणि त्यातून आम्ही स्वत:ला सावरून केलेले मार्गक्रमण आम्ही आमच्या वाचकांमुळेच शक्य झाले हे सांगू इच्छीतो.
अडीच दशकांपुर्वी पत्रकारीतेला सुरूवात केली. पत्रकारीता काय असते, पॅनल काय असते, बॅनर काय असते, बॉटम काय असते, साईड बॅनर काय असते याची पुसटशी कल्पना सुध्दा आम्हाला नव्हती. घडलेल्या कांही घटनांना पत्रकारांसमक्ष सांगून आपले काम झाले असे सुरूवातीला वाटत होते. पण पत्रकारांना त्या घटना लिहिण्यात रस दिसला नाही. तेंव्हा पहिला कागद घेतला आणि बातमी लिहिली त्या बातमीचा इंट्रो काय असतो, तो कसा लिहायचा असतो याची कल्पना सुध्दा नव्हती. लिहिल्यानंतर मात्र एका पत्रकाराने ती बातमी आपल्या वर्तमान पत्रात छापली. त्याचा अभ्यास केला तेंव्हा असे जाणवले की, आम्ही लिहिलेल्या बातमीमधील खालच्या ओळीवर आणि वरच्या ओळी खाली लिहिलेल्या आहेत. या संदर्भाने अनेक बाबी लक्षात आल्या आणि लहानपणी अ आ गिरवल्याप्रमाणे आम्ही बातम्या लिहिण्याची सुरूवात केली. यात हळुहळू त्यात प्रगती झाली.ज्यांच्यासोबत ही सुरूवात केली होती. त्यांनी आमचा उपयोग करायला सुरूवात केली. अनेक रंगांचे आणि अनेक भावनांचे मिश्रण करून आम्ही तो उपयोग सहन केला. कारण आम्हाला आकाशाला गवसणी घालायची होती. जेंव्हा आम्ही आकाशाला पोहचायचे ठरवलेच तेंव्हा त्याच्या उंचीचा विचार केला नाही. आणि हळूहळू आमच्या उडाण क्षमतेला उभारी देत गेलो आणि ती फळाला येत गेली. उपयोग अनेकांनी केला. त्यात सर्वात मोठा वाटा अ-भंगी यांचा होता. आज लोकांसमक्ष आम्ही भरपूर कांही मोठे आहोत असे व्यक्त करणारे, दाखवणारे, सुध्दा आमच्या दारात येवून बसत होते. आम्ही फक्त सत्यासाठीच हे व्रत ठेवून सुरू केलेले काम आजही करत आहोत. आम्ही कधीच कोणते वळण घेतले नाही, कोणत्याही प्रकारच्या आहारी गेलो नाहीत. 52 टक्क्यांचा जाहिरातींचा धंदा तर केलाच नाही. लिहितांना आम्ही कोणाविरुध्द लिहित आहोत याचा विचार केला नाही. तारीफ करतांना सुध्दा त्या व्यक्तीच्या ऐवजी त्या व्यक्तीमधील वृत्तीची तारीफ केली. विरोधात लिहितांना सुध्दा व्यक्तीच्या विरुध्द न लिहिता त्यातील वाईट वृत्तीविरुध्द लिखाण केले. जीवनात सत्य लिहितांना भरपूर सोसावे लागले. आमच्या सत्य लिखाणाने आमच्यावर प्रेम करणाऱ्यांना सुध्दा अनेकदा त्रास झाला. पण आम्ही आमची सत्याची वृत्ती कधीच सोडली नाही. आमच्या वृत्तीतील दुर्भाग्य असे आहे की, आम्हाला जरा लवकरच कळते. एक आयपीएस अधिकारी आमच्या सत्याविषयी बोलतांना सांगत होता की, तुम्ही जरा जास्तच सत्य बोलता पण आम्ही या सर्व बाबींना दुर्लक्षीत करून मुळ लक्षाकडेच केंद्रीत होतो त्यामुळे आमच्या विरुध्द बोलल्या गेलेल्या शब्दांची किंमत आम्ही कधीच केली नाही. आजही आम्ही आमच्या वाचकांनी 176 दिवसांमध्ये 2 लाखांचा आकडा पार करून आमच्या लिखाणाला दिलेल्या पसंतीचे ऋणी आहोत. आम्ही वाचकांचे धन्यवाद म्हणून फेडू इच्छीत नाही. वाचकांच्या त्या ऋणासह आम्हाला मृत्यू यावा अशी आमची जगाच्या मालकाकडे प्रार्थना आहे.
आज वास्तव न्युज लाईव्हने पार केलेला आकडा पाहिल्यानंतर स्वत:वर खुप आनंद झाला. तीन दशकात वेगवेगळ्या लोकांच्या सेवा करतांना कधीच त्यांचा फायदा घेतला नाही. उलट त्यांनीच आमचा फायदा घेतला. कांहींनी तर आम्हाला पत्रकार कमी आणि स्वत:च्या गाडीचे चालक जास्त समजले. पुढे आम्ही त्यांना तलाख दिला. अशांची संख्या भरपूर मोठी आहे. पण समाजाच्या हितात काम करण्याची, ज्याचे कोणीच ऐकत नाही. त्याचे दु:ख मांडण्याची केलेली सुरूवात आम्ही कायम ठेवली. समाजाला त्रासदायक असणाऱ्या वृत्तीबद्दल लिहितांना आम्ही कडक शब्दांचा वापर केला. न्यायदानामध्ये सुध्दा प्रतिबंधात्मक आणि सुधारणात्मक अशा दोन विचार श्रेणीवर न्यायदान होत असते आणि तेथूनच आम्ही प्रतिबंधात्मक हा शब्द घेतला आणि ती भावना कडक असते म्हणून त्याचा उपयोग केला. न्यायदान होतांना सुध्दा असेच घडते. आम्हाला न्यायदान करण्याचा अधिकार नाही पण घडलेला प्रकार आणि त्यातील सत्य मांडण्याचा अधिकार नक्कीच आहे. आणि त्याचसाठी आम्ही आजपर्यंत काम केले आहे, पुढे सुध्दा करणार आहोत. कांही बोरू बहाद्दरांनी आमच्या कांही व्यक्तीगत घटनांचा दुरूपयोग केला. पण त्यांना हे कळलेच नाही की त्या उपयोगाचा वाईट परिणाम त्यांच्यावरच होणार होता आणि तो झाला सुध्दा. कधी काळी अनेक मोठ-मोठ्या लोकांचा मीच फक्त त्यांच्या जवळचा आहे असा बोभाटा करून समाजाला त्या मोठ्या लोकांच्या नावावर वेठीस धरणाऱ्यांची आजची कथा भरपूर कांही सांगते. त्यामुळे आम्ही त्याचा विचार केला नाही. आम्हाला कोणी जवळ नाही तरी चालेल पण आमच्या लिखाणाला वाचणाऱ्या वाचकांनी आज आमच्या न्युज पोर्टलला दिलेला 2 लाखांचा आकडा सर्व कांही सांगतो.


वास्तव न्युज लाईव्हचा जन्म कसा झाला हे सुध्दा आजच्या दिवशी वाचकांसमोर मांडण्याची इच्छा आहे. अनेक वर्तमान पत्रांमध्ये आणि कांही न्युज पोर्टलमध्ये काम करतांना कुठे तरी आमचा उपयोग त्यांच्यासाठी भरपूर होतो आणि त्यानंतर आमची त्यांना गरज नसते असे जाणवत होते. पण आपले लिखाण बंद होईल या अस्वस्थतेने मन खिन्न होत असे. अनेक पत्रकारांनी आमच्या लिहिलेल्या बातम्या घेवून आपल्या पेपरमध्ये बॅनर छापले आहेत. त्या बातम्यांसाठी आमच्या समक्ष त्या पत्रकाराची तारीफ करतांना आम्ही लोकांना पाहिले आहे. त्याही वेळेस आम्हाला वाईट कधी वाटले नाही. उलट आनंदच होत असे.कांही शब्द गुंड सुध्दा आहेत. त्यांनी तर आपल्या शब्दांच्या आधारे उच्छाद मांडला. वर्तमान पत्र आणि न्युज पोर्टल यामध्ये काम करतांना प्रत्येक जण आमचे लिखाण म्हणजे व्यक्तीगत आहे असा उल्लेख करतात. आज आम्ही आमच्या वाचकांना विनंती करू इच्छीतो वास्तव न्युज लाईव्हच नव्हे तर आमच्या सुरूवातीच्या पहिल्या बातमीपासून आजपर्यंतच्या कोणत्याही बातमीत आमच्याबद्दल कांही आक्षेप असतील तर ते आम्ही ऐकायला तयार आहोत. हे काम सुरू असतांना वास्तव न्युजचे संपादक कंथक सुर्यतळ यांनी एप्रिल महिन्यात वास्तव न्युज हे नाव आम्हाला दाखवले. त्यानंतर त्याचे रंग रुप बदलण्यात कांही वेळ गेला आणि अखेरीस 20 मे 2021 रोजी वास्तव न्युज लाईव्हने आपल्या पदार्पणाचे पाऊल ठेवले. आज या पहिल्या दिवसाला 176 दिवस पुर्ण झाले आहेत. आणि या 176 दिवसांमध्ये वाचकांनी दोन लाखांचा आकडा पार करून आमच्या लिखाणाला दिलेली पसंती ऑनलाईन आहे. आज 2 लाखांचा आकडा पाहिला तेंव्हा आनंद झाला. वास्तव न्युज लाईव्हच्या सुरूवातीनंतर कांही बातम्यांना वाचकांनी दिलेली पसंती अशी आहे की, एकदा रिफ्रेश बटन दाबल्यावर 500 वाचकांची वाढ होत होती. याची सरासरी दररोज 1156 होत आहे. वास्तव न्युज लाईव्ह सुरू झाले तेंव्हा ज्या लोकांनी आमचा उपयोग स्वत:च्यासाठी केला त्यांना तर आम्ही एका क्षणात तलाख देवू टाकला. विचार केला मागील तीन दशकांपासून आपण केलेल्या मेहनतीचे काय परिणाम येतील हे आपल्याला दिसेल आणि आम्ही केलेल्या कर्तबांना प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या तर ते कर्तब मौल्यवान ठरेल नसता आम्ही त्याला अपघात समजू या शब्दांना मनामध्ये ठेवून सुरू झालेले वास्तव न्युज लाईव्ह आजच्या वाचकांच्या पसंती क्रमामध्ये चांगल्याच जागी आहे असे आम्हाला वाटते.
कांही लोक आमच्या लिखाणाबद्दल आमच्यावर, आमच्या कुटूंबावर वाईट शब्दात टिका करतात त्याला पत्रकार मंडळी आमचा आणि त्या व्यक्तीचा व्यक्तीगत वाद असे सांगतात. एखाद्या पत्रकाराला एखादा वाईट शब्द बोलल्यानंतर संपूर्ण संघटना त्याच्यासाठी उभी राहिलेली आम्ही पाहिलेली आहे. पण आमच्यासाठी लिहिल्या शब्दांबद्दल कोणीही पत्रकार कधी बोलला नाही. त्याचे आम्हाला दु:ख सुध्दा नाही.पण एकाने आमच्याबद्दल वाईट लिहिणाऱ्यांची काढलेली वरात आम्हाला माहित आहे. आम्ही त्याचे ऋणी आहोत. मी लिहिले मीच सोसणार, मी लिहिले सन्मान माझाच होणार या शब्दांवर आम्ही विश्र्वास ठेवला आणि ज्याची जागा त्याला आपोआप दिसली. एक विचारवंत म्हणतो कधी तलवारीला त्रास देवू नका कारण मरणारा हा फक्त तुमच्या शब्दांनी मरून जाईल यावर विश्र्वास ठेवून आम्ही काम करत आहोत. या जगात महत्व वेळेचे नसून भावनांचे असते, कोणी दोन मिनिटात मन जिंकून घेत असत तर कोणी जीवनभर आपल्या सोबत राहुन ते जमत नसत.


आज तीन दशकांमध्ये आम्ही जमवलेेले अनेक मित्र आहेत. जे महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात कार्यरत असतांना सुध्दा आजही आमच्या लिखाणाचे वाचन करतात आणि आम्हाला त्याबद्दल शाब्बासकी सुध्दा देतात. नांदेडमध्ये सुध्दा असंख्य लोक आहेत जे समोर येवून आमच्या पाठीवर थाप देत नाहीत पण ते बोलतांना आम्ही सत्य लिहितो असे सांगतात. यावरून सुध्दा वाचकांना आम्ही केलेल्या आजपर्यंतच्या प्रवासाची कल्पना येईल. आमची कोणाशीही दुश्मनी नाही पण त्या व्यक्तीमध्ये असलेल्या वाईट वृत्तीशी खेटण्याची आमची नेहमीच तयारी होती, आजही आहे आणि पुढेही ती राहणारच आहे. आम्ही त्यातून कधीच मागे फिरणार नाही. आमच्या जीवनात आमच्या बातम्यांमुळे लोकांना न्याय मिळाला याची उदाहरणे एवढी आहेत की, ती लिहिणे सुध्दा अशक्य होईल. अनेक व्यक्ती आमच्या बद्दल असे बोलतात जगलो आहोत तर तुमच्यामुळेच नाही तर आम्ही कधीच संपलो असतो. आमच्या विरुध्द बोलणाऱ्यांच्या शब्दांना आम्ही आमच्याविरुध्द चालणाऱ्या उलट्या हवेला ती हवा आम्हाला वर घेवून जाण्यासाठीच वाहते आहे असे घेतले आहे आणि त्यामुळेच आम्ही आज एक नव्या रुपात वाचकांसमोर काम करायला सुरूवात केली आहे. आम्ही घेतलेले ओनली फॉर ट्रुथ हे वचन आम्ही कधीच मोडणार नाही अशी ग्वाही आज आम्ही आमच्या वाचकांसमोर व्यक्त करून त्यांना धन्यवाद देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *