नांदेड(प्रतिनिधी)-राज्यभरातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारी संदर्भाने वेतन तफावत दुर करण्यासाठी राज्यातील सर्व पोलीस अंमलदारांची माहिती पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी मागवली आहे. या संदर्भाचे पत्र अपर पोलीस महासंचालक प्रशासन अनुप कुमार सिंह यांनी 11 नोव्हेंबर रोजी निर्गमित केले आहे. राज्यात सन 2001 त े2008 या कालखंडात पोलीस भरती झालेल्या अंमलदारांविषयी ही माहिती पाठवायची आहे. ही सर्व माहिती 2008 पर्यंतची मागविण्यात आली आहे.
पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या व्हॉटसऍप संकेतस्थळावर संदेश वजा तक्रारी प्राप्त होत आहेत. ज्यामध्ये सन 2001 ते 2005 पर्यंत पोलीस शिपाई पदावर भरती झालेल्या पोलीस अंमलदारांना सन 2006 मध्ये पोलीस शिपाई पदावर भरती झालेल्या पोलीस अंमलदारापेक्षा दोन वेतन वाढ कमी मिळत आहेत असे ते संदेश आहेत. वरिष्ठ पोलीस अंमलदाराला कनिष्ठ पोलीस अंमलदारापेक्षा कमी वेतन मिळत असल्याच्या संदेश वजा तक्रारी बाबत नियमित तोडगा काढण्यासाठी आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला दुर करण्यासाठी पोलीस महासंचलाकांनी राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना सन 2001 ते 2008 या कालावधीत पोलीस शिपाई या पदावर भरती झालेल्या सर्व पोलीस अंमलदारांची माहिती 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
सन 2001 ते 2008 या कालावधीत पोलीस शिपाई पदावर भरती झालेल्या व्यक्तीचा भरती दिनांक व भरती वेळी निश्चित केलेले मुळ वेतन. सन 2001 ते 2008 मध्ये भरती झालेल्या पोलीस शिपायास पोलीस नाईक पदी पदोन्नती मिळाल्याचा दिनांक आणि पोलीस नाईक पदावर निश्चित केलेले मुळ वेतन सन 2001 ते 2008 मध्ये भरती झालेल्या पोलीस शिपायास पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती मिळाल्याचा दिनांक आणि पोलीस हवालदार पदावर निश्चित केलेले मुळ वेतन. सन 2001 ते 2008 मध्ये भरती झालेल्या पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदी पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांचा तो दिनांक आणि मुळ वेतन. अशा स्वरुपात ही माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाला राज्यातील प्रत्येक घटक प्रमुखाने 22 नोव्हेंबरपर्यंत पाठवायची आहे.
पोलीस महासंचालकांनी घेतलेल्या या निर्णयाचे पोलीस दलात स्वागत होत आहे. पोलीस घटक प्रमुखाकडे पोलीस खात्यातील तोंड दाबून बुक्यांचा मार अशा स्वरुपात कामकाज चालत असते. त्यामुळे पोलीस अंमलदारांना आपला अन्याय दुर करून घेता येत नाही. पोलीस महासंचालकांनी फेसबुक लाईव्ह, व्हॉटसऍप संदेश याद्वारे राज्यभरातील पोलीसांना आपल्या समोर येणे सहज केल्यामुळे पोलीस अंमलदार आनंदी आहेत. राज्यातील प्रत्येक पोलीस घटकामध्ये हा वेतन तफावतीचा घोळ का झाला याचा शोध घेवून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी चुक करणाऱ्यांविरुध्द कार्यवाही करावी अशी अपेक्षा सुध्दा व्यक्त होत आहे.
2001 ते 2008 या दरम्यान पोलीस झालेल्या अंमलदारांच्या वेतनातील तफावत पोलीस महासंचालक शोधणार