इतवारा भागात पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणारा एक पोलीस कोठडीत; इतरांचा शोध सुरु 

नांदेड(प्रतिनिधी)-त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनेनंतर नांदेडमध्ये झालेल्या निषेध सभेनंतर जमावातील समाजकंटकांनी तुफान दगडफेक करून अनेक पोलीसांना जखमी केले, अनेक गाड्यांची नासधुस केली याप्रकरणी अनेक नावांसह इतवारा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
त्रिपुरा येथील हिंसाचार आणि इस्लामविरोधी दंगे बाबत कोणाचीही परवानगी न घेता देगलूरनाका परिसरात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. दि.12 नोव्हेंबर रोजी मोठ्या स्वरुपातला जमाव या ठिकाणी जमला आणि त्यात अनेक भाषणे झाली. त्यानंतर धरणे आंदोलन संपले आणि परतणाऱ्या जमावातील समाजकंटकांनी अनेक वाहनांवर दगडफेक केली. त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीसांवर सुध्दा दगडफेक झाली. कांही समाजकंटकांनी देशी दारु दुकानातून असंख्य बाटल्या उपलब्ध केल्या आणि त्या बॉटल्या पोलीसांकडे भिरकावल्या. ज्या ठिकाणी पोलीसांवर हल्ला झाला, गाड्यांची नासधुस झाली त्याठिकाणी चारही बाजूने जमाव आणि पोलीस त्या चौकोनात अडकले. जमावाला नियंत्रीत करण्यासाठी पोलीसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, बळाचा प्रयोग केला. तरीपण जमाव शांत होत नव्हता. वेगवेगळ्या रस्त्यावरील जमावाने पोलीसांवर केलेली दगडफेक आणि दारुच्या बॉटल्या भिरकावून अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे, पोलीस अंमलदार मोईनोद्दीन, युनूस कासार, पंकज इंगळे, मानेकर, होलगिरे, कोरडे, शहा, उदावंत, बारोळे आदी जखमी झाले. जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये पोलीसांचे वाहन क्रमांक एम.एच.26 आर.584, एम.एच.20 ए.वाय.2534, एम.एच.26 आर.0088, एम.एच.26 आर.123 अणि एम.एच.26 आर.485 या वाहनांची तोडफोड करण्यात आली. यासह अनेक खाजगी वाहनांची सुध्दा समाजकंटकांनी तोडफोड केली.
धरणे आंदोलन सुरू होण्यापुर्वी पोलीसांनी खुबामस्जिद समोर जमावाला परवानगी नसल्यामुळे असंवैधानिक कृत्य करू नये अशा सुचना तोंडी दिल्या होत्या. पण जमावाने पोलीसांच्या सुचना ऐकल्या नाहीत. त्या ठिकाणी 6 ते 7 हजार जणांचा जमाव होता. जखमी झालेल्या पोलीसांमध्ये कांही जणांना गंभीर मार लागला आहे. कांहींना साधा मार लागला आहे. या प्रकरणी इतवाराचे पोलीस उपनिरिक्षक शेख असद शेख चॉंद पाशा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन जवळपास 25 ते 26 जणांच्या नावासह 400 ते 500 अनोळखी लोकांसह गुन्हा क्रमांक 284/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 353, 337, 338, 323, 326, 143, 147, 148, 149, 188, 427 सह मुंबई पोलीस कायदा कलम 135, मालमत्ता विद्रुपीकरण कायदा कलम 3, 7 (1)(ब) सोबत क्रिमिनल लॉ अमेंटमेंट कायदा, साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.एस.मुत्तेपोड हे करीत आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेला  आरोपी शेख जुबेर शेख सादिक यास  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोनाली सोयंके यांनी एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *