नांदेड(प्रतिनिधी)-माहितीच्या अधिकारात इतरांना गजाआड पाठविण्याची भिती दाखवणाऱ्या पवन बोरोला आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोनाली सोयंके यांनी दोन दिवस अर्थात 15 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.3 नोव्हेंबर रोजी फटका व्यापारी धनराज बद्रीनारायण मंत्री यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना पिस्तुल दाखवून ठोक दुंगा म्हणजेच मारून टाकील असे म्हणणाऱ्या पवन जगदीश बोरा उर्फ शर्मा, दत्तात्रय पांडूरंग अनंतवार आणि गौतम नरसींगदास हिरावत उर्फ गौतम जैन अशा तिघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 307, खंडणीसाठी कलम 384 यासह अनेक कलमे आणि भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा क्रमांक 397/2021 दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांच्याकडे देण्यात आला.
काल दि.12 नोव्हेंबर रोजी रवि वाहुळे आणि त्यांच्या पोलीस पथकाने त्यास अटक केली. आज 13 नोव्हेंबर रोजी रवि वाहुळे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अमंलदारानी पवन जगदीश बोराला न्यायालयात हजर करून त्याने फटाका व्यापाऱ्याला दाखवलेली बंदुक जप्त करणे आहे. या गुन्ह्यात अजुन कोणी आरोपी सहभागी आहेत काय याचा शोध घेणे आहे असे सादरीकरण करत पोलीस कोठडीची मागणी केली. युक्तीवाद ऐकुन न्यायाधीश सोनाली सोयंके यांनी पवन जगदीश बोरा उर्फ शर्माला दोन दिवस अर्थात 15 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाची विद्युतगती कार्यवाही

दि.28 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकार तपास समितीचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय पांडूरंग अनंतवार यांनी एक अर्ज दिला. या अर्जात हिंगोली गेट येथील मोकळ्या जागेत फटाका व्यापाऱ्यांनी विनापरवानगी आणि नियम बाह्य दुकाने सुरू केली आहेत. बंदी असलेले फटाके विक्री करत आहेत. ज्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन होत नाही. या अर्जावर अपर जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी अत्यंत विद्युत वेगाने कार्यवाही केली आणि एक पत्र तयार केले. ते पोलीस अधिक्षक नांदेड, मनपा आयुक्त नांदेड, उपप्रादेशिक प्रदुषण नियंत्रण अधिकारी, पोलीस निरिक्षक वजिराबाद आणि अग्नीशमन अधिकारी मनपा नांदेड यांना कांही तासातच अग्रेशीत केले. हेे अग्रेशीत केलेले पत्र वजिराबाद पोलीस ठाण्यात कोणी आणले याचा शोध होण्याची नितांत गरज आहे. कारण हा अर्ज आला आणि 29 ऑक्टोबरला पोलीस ठाणे वजिराबादच्या अधिकाऱ्यांसोबत खंडणीखोर मंडळी तेथे गेली आणि वाद झाला. त्यानंतर या घटनेची तक्रार धनराज मंत्री यांनी 3 नोव्हेंबर रोजी दिली आणि हा सर्व प्रकार घडला. यातील पवन बोरा हा प्रदेशाध्यक्ष आहे. मुळात ही माहिती अधिकार संरक्षण समितीच अस्तित्वात न सल्याचे या समिती संस्थापक अध्यक्ष शेख जाकीर शेख सगीरने सांगितलेले आहे. कांही दिवसांतच शेख जाकीर शेख सगीरने या समितीचे नाव बदलून जनहित माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य असे केलेले आहे.