नांदेड(प्रतिनिधी)-20 जुलै 2021 रोजी गाडीपुरा भागात विक्रम उर्फ विक्की ठाकूरचा खून करणाऱ्या गुन्हेगारांपैकी एकाने पकडल्यानंतर दिलेल्या तक्रारीवरुन विक्की ठाकूरच्या तीन मित्रांविरुध्द दाखल झालेल्या गुन्ह्यात आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.डी.खोसे यांनी मयत विक्की ठाकूरच्या तीन मित्रांना जामीन मंजुर केला आहे.
20 जुलै रोजी विक्की ठाकूरचा खून झाला तेंव्हा त्याच्यासोबत असलेला मित्र सुरज भगवान खिराडेच्या तक्रारीवरुन विक्की ठाकूरचा खुन करणाऱ्या बिघानिया गॅंग विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढे बिघानिया गॅंगच्या सर्वच गुन्हेगारांना स्थानिक गुन्हा शाखेने गजाआड केले. गजाआड झालेल्यांमध्ये एक मयुरेश सुरेश कत्ते हा युवकपण होता. पकडल्यानंतर 20 जुलै रोजी निखील उर्फ कालू मदणे, ईश्र्वरसिंघ गिरनीवाले आणि सुरज खिराडे या तिघांनी माझ्यावर जिवघेणा हल्ला करत माझ्यावर बंदुकीतून गोळी झाडली. त्यात मी जखमी झालो असे लिहिले. या प्रकरणी इतवारा पोलीसांनी आरोपीच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 182/2021 दाखल केला. या प्रकरणात पोलीसांनी या तिघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 307 आणि भारतीय हत्यार कायद्यानुसार विहित वेळेत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सुरज भगवान खिराडेच्यावतीने जामीन अर्ज क्रमांक 604/2021 दाखल करण्यात आला. तसेच निखील उर्फ कालू प्रकाश मदने आणि ईश्र्वरसिंघ जसवंतसिंघ गिरणीवाले यांच्यावतीने जामीन अर्ज क्रमांक 643/2021 दाखल करण्यात आला. दोषारोपपत्रामध्ये दाखल करण्यात आलेले वैद्यकीय अहवाल आणि तिघांकडून कोणतेही हत्यार जप्त न होणे ही बाब या आरोपींविरुध्द फायदेशीर असल्याचे ऍड.यदुपत अर्धापूरकर यांनी आपल्या युक्तीवादात मांडले. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एन.डी.खोसे यांनी या तिघांना जामीन मंजुर केला आहे. या प्रकरणाचे दोषारोपपत्र सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.एस.मुत्येपोड यांनी दाखल केले होते. या जामीन प्रकरणात ऍड. यदुपत अर्धापूरकर यांना ऍड. रामसिंघ मठवाले यांनी सहकार्य केले.