माहिती अधिकाराचे सर्वेसर्वा दत्तात्रय पांडूरंग अनंतवारला न्यायालयाने अटकपुर्व जामीन नाकारला

नांदेड(प्रतिनिधी)-48 तासापुर्वी फटका व्यापाऱ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या एका आरोपीला अंतरिम (तात्पुरता) अटकपुर्व जामीन मंजुर झाल्यानंतर 48 तासातच या प्रकरणातील दुसरा आरोपी दत्तात्रय पांडूरंग अनंतवारचा जामीन अर्ज सत्र न्यायाधीश एन.के.गौतम यांनी फेटाळून लावला आहे. 
                 नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्याच्या 3 नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात दत्तात्रय अनंतवारने धनराज बद्रीनारायण मंत्री यांच्याविरुध्द त्यांच्या व्यवसायाची चौकशी व्हावी म्हणून अर्ज देवून खंडणी मागितली आणि बंदुक दाखवून जिवघेणा हल्ला केला अशा सदरात गुन्हा दाखल झाला. 28 ऑक्टोबरला दत्तात्रय पांडूरंग अनंतवार यांनी जिल्हाधिकारी नांदेडकडे दिलेला अर्ज 28 तारखेलाच अत्यंत जलदगतीने वजिराबाद पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात आला.  अनंतवार, पवन जगदीश बोरा आणि गौतम जैन हे तिघे 29 ऑक्टोबर रोजी दुपारी धनराज मंत्रीच्या दुकानात गेले आणि तेथे झालेल्या चर्चेत पवन बोराने आपल्याकडील पिस्तुल काढून धनराज मंत्रीवर रोखले आणि तुझे ठोक दुुंगा असे सांगितले. पुढे धनराज मंत्रीने तक्रार दिल्यानंतर गुन्हा क्रमांक 397 दाखल झाला आणि तिनही आरोपी फरार झाले. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांच्याकडे देण्यात आला. रवि वाहुळे यांनी पवन बोराच्या घरातून उपनिबंधक सहकारी संस्था असे लिहिला एक रबरी शिक्का जप्त केला सोबतच पिस्तुल आणि 14 रिकामे काढतूस जप्त केले. सोबतच दत्तात्रय अनंतवारच्या घरातून माहिती कायद्याअंतर्गत मागितलेले अनेक अर्ज जप्त केले. या संदर्भाने दत्तात्रय अनंतवार यांनी दाखल केलेल्या फौजदारी किरकोळ अर्ज क्रमांक 893 आणि गौतम जैन यांनी दाखल केला अर्ज क्रमांक 899 या दोन्ही अर्जांची सुनावणी 16 नोव्हेंबर रोजी होती. पोलीसांनी त्या दिवशी बंदचे वातावरण आहे असे लिहुन तारीख वाढवून मिळण्यासाठी विनंती केली होती. अर्ज क्रमांक 899 मध्ये अंतरिम (तात्पुरती) जामीन मिळावा असाही अर्ज होता. त्यावरून न्यायाधीश एन.के.गौतम यांनी गौतम जैनला 16 नोव्हेंबर रोजी तात्पुरती (अंतरिम)  अटकपुर्व जामीन मंजुर केली आहे. त्या अर्ज क्रमांक 899 ची पुढील सुनावणी 30 नोव्हेंबर रोजी आहे. 
                  त्या दिवशी अर्ज क्रमांक 893 मध्ये आज दि.18 नोव्हेंबरची तारीख देण्यात आली होती. त्यानुसार आज या प्रकरणात पोलीसांनी आपला से अर्थात म्हणणे दाखल केले. सहाय्यक सरकारी वकील ऍड. यादव तळेगावकर यांनी या प्रकरणात सादरीकरण करतांना सांगितले की, माहिती अधिकाराचा दुरूपयोग करून दत्तात्रय अनंतवारने अनेक जणांकडून खंडणी मागितली असे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 451/2021 दाखल आहे. आरोपी दत्तात्रय अनंतवारला अटकपुर्व जामीन दिली तर साक्षीदार भयभित होतील आणि त्यांच्यावर परिणाम होईल. 25 ऑक्टोबर रोजी धनराज मंत्रीला 40 हजारांची खंडणी मागुन ती दिली नाही म्हणून 28 ऑक्टोबर रोजी तक्रार देण्यात आली आहे. दत्तात्रय अनंतवारला जामीन दिला तर त्याच्या मनात कायद्याबद्दल भिती राहणार नाही आणि पुन्हा असे गुन्हे तो करेल असे सादरीकरण केले. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एन.के.गौतम यांनी दत्तात्रय अनंतवारचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *