पोलिसांच्या आवाहनाला पहिला प्रतिसाद आला
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसांच्या आवाहानाला प्रतिसाद देत माहिती अधिकाराचे सर्वेसर्वा अनंतवार विरुध्द नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षाणाधिकारी यांनी आपल्याला गंडविल्याची तक्रार दिल्यानंतर शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. आजच अनंतवारचा एक अटकपुर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी प्रशांत प्रकाशराव दिग्रसकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन 2012 मध्ये ते गटविकास अधिकारी म्हणून पंचायत समिती नायगाव येथे कार्यरत होते. त्यावेळी मौजे कांडाळा ता.नायगाव येथे मनरेगाच्या कामांचे पैसे वाटप करण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर ते पैसे वाटप होतांना कांडाळा गावाशी कांही एक संबंध नसतांना विनाकारण शासकीय कर्मचाऱ्यांना वेठीस धरुन त्यांच्याकडून खंडणी वसुल करण्याचा उपक्रम दत्तात्रय पांडूरंग अनंतवार (55) रा.कवाना ता.हदगाव जि.नांदेड यांनी चालवला होता. त्यावेळी माझ्याही कामात हस्तक्षेप केला. मी 50 हजार रुपये त्यांना द्यावे अशी मागणी मला करण्यात आली. तुझी नोकरी संपवतो, तुला सेवेतून बडतर्फ करायला लावतो अशी धमकी देवून मला नांदेडच्या पीपल्स हायस्कुल गोकुळनगर रस्त्यावर सन 2015 मध्ये त्या खंडणीची मागणी केली. त्यापुर्वी नायगाव येथे असतांना मी पैसे दिले नाही म्हणून माझ्याविरुध्द पोलीस ठाणे नायगाव येथे तक्रार केली. पोलीसांनी प्रतिसाद दिला नाही तेंव्हा न्यायालयातून फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम 156(3) नुसार माझ्याविरुध्द गुन्हा दाखल करायला लावला.
यापेक्षा भारी असे घडले की, प्रशांत दिग्रसकर यांच्या पदोन्नतीमध्ये अडचणी येवू लागल्या तेंव्हा त्यात कांही तरी ‘मांडवली’ झाली आणि दत्तात्रय अनंतवारने 100 रुपयांच्या मुद्रांक कागदावर (बॉन्डवर) प्रशांत दिग्रसकरला पदोन्नती देण्यात माझी कांही हरकत नाही असे लिहुन दिलेला तो कागद प्रशांत दिग्रसकर यांच्याकडे आहे. दि.17 नोव्हेंबर रोजी प्रशांत दिग्रसकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 451/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 384 आणि 385 नुसार दाखल करतांना झालेल्या उशीराचे स्पष्टीकरण सुध्दा एफआयआरमध्ये प्रशांत दिग्रसकर यांच्या सांगण्यानुसार घेतलेले आहे. त्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक केदार यांच्याकडे देण्यात आला आहे.
वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 397 नंतर पोलीस विभागाने जनतेला आवाहन केले होते की, माहिती अधिकाराअंतर्गत कोणीही जनतेला त्रास दिला असेल, खंडणी मागीतली असेल, खंडणी घेतली असेल तर तक्रार द्या. पोलीसांच्या या आवाहनाला शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी पहिला प्रतिसाद दिला आहे. जनतेतील अजूनही कांही लोकांना खंडणीचा त्रास झाला असेल,कोणी खंडणी मागितली असेल,कोणी घेतली असेल ते कोणीही असो,तसेच खंडणी मागणारा कोणी फुकटात पोलीस सुरक्षा रक्षक वापरत असेल आणि तो जिल्ह्यातील असेल,बाहेरचा असेल तरीही त्रास झालेल्या प्रत्येकाने पोलीसांकडे तक्रार द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.