महिलेची मनाठा पोलीस ठाण्यात तक्रार;नवीन धंदा आला समोर
नांदेड,(प्रतिनिधी)- माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय पांडुरंग अनंतवारने बरडशेवाळा येथे गायरान जमीन माझीच आहे असे सांगून तो भूखंड विक्री करून एका महिलेची ४ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याचा गुन्हा मनाठा पोलिसांनी दाखल केला आहे.पोलिसांच्या आवाहनाला हा दुसरा प्रतिसाद आहे.माहिती अधिकारासोबत हा नवीन धंदा समोर आला आहे.
भारतबाई सुभाष पवार (३८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या आपला नवरा,सासरा आणि मुले असे बरडशेवाळा येथे राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ऑक्टोबर २०१८ मध्ये ते आपल्यासाठी बरडशेवाळा येथे भूखंड शोधत असतांना दत्तात्रय पांडुरंग अनंतवारने माझ्याकडे आहे भूखंड आणि तो मला विक्री करायचा आहे असे सांगितले.तो भूखंड गाव नमुना क्रमांक ८ वर आपल्या नावाने आहे असे आम्हाला दाखवले.बरडशेवाळा ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक ५८ आहे असे दाखवले.याची तपासणी आम्ही केली असता तो भूखंड अनंतवारच्या नावे असल्याचे दिसले.म्हणून आम्ही त्याच्या सोबत सौदा केला.भूखंडाची किंमत ४ लाख ५० हजार रुपये ठरली.आम्हाला दाखवलेल्या भूखंडावर कच्या बांधकामाचे चहा पाण्याचे हॉटेल होते.हे हॉटेल लक्ष्मण भगवान इजळकर यास भाड्याने दिले आहे ते दुकान रिकामे करून आपल्यास देतो असे सांगितले.
झालेल्या सौद्या प्रमाणे दिनांक ९ ऑक्टोबर २०१८ रोजी आम्ही आणि अनंतवार हदगाव दुय्यम निबंधक कार्यालय येथे गेलोत.तेथे अनंतवार म्हणाला रजिस्ट्रीसाठी किमती प्रमाणे पैसे जास्त लागतात म्हणून किंमत कमी दाखवून रजिस्ट्री करुत तुमचेच पैसे वाचतील.तेव्हा भूखंडाची किंमत १ लाख ३० हजार रुपये दाखवून रजिस्ट्री केली.पण त्याच दिवशी बँकेमार्फत एकूण ४ लाख ५० हजार रुपये अनंतवारने आपल्या बँक खात्यात घेतले आहेत. त्यानुसार दस्तऐवज क्रमांक २७६२/२०१८ आमच्या नावावर तयार झाले. त्यांनतर भूखंडाचा ताबा देण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला तेव्हा अनंतवार आम्हाला आज उद्या करून पुढे ढकलत होता.
आम्ही स्वतः तपासणी केली तेव्हा आम्हाला विक्री केलेला भूखंड हा शासकीय गायरान आहे असे समजले. सोबतच लक्ष्मण इजळकर यांच्याकडे सुद्धा त्या भूखंडचा गाव नमुना क्रमांक ८ त्याच्या नावावर आहे,ती मालमत्ता क्रमांक ५८ त्यांची आहे असे दिसले. पण खरे तर ते गायरान आहे. तेव्हा अनंतवारला आम्ही भूखंडासाठी दिलेले ४ लाख ५० हजार रुपये मागितले.तेव्हा सुद्धा आज उद्याचे चॉकलेट दाखवून अनंतवारने वेळ मारून नेली.पुढे तर त्याने आमचे पैसे ४ लाख ५० हजार देणार नाहीच असे सांगितले आणि काय करायचे ते करून घ्या असे आम्हाला धमकावले. मनाठा पोलिसांनी या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक १५०/२०२१ भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०,४६५,४६७,४६८,४७१ प्रमाणे दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास मनाठाचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या कडे देण्यात आला आहे.
सध्या दत्तात्रय पांडुरंग अनंतवार हे फरार आहेत.त्यांच्या विरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक ३९७ मध्ये न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.तसेच कालच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिक्षण अधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. माहिती अधिकार कायद्याच्या दुरुपयोगासह गायरान जमिनी नोंदणी करून विक्री केल्याचा नवीन धंदा समोर आला आहे. पोलिसांनी केलेल्या आवाहनाला हा दुसरा प्रतिसाद आहे.दत्तात्रय अनंतवारसह कोण कोण असे व्यक्ती नांदेड जिल्ह्यात माहिती अधिकाराच्या नावाखाली वावरत आहेत याचा शोध सुद्धा पोलिसांनी घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.