
नांदेड(प्रतिनिधी)-दोन वर्षापुर्वी लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीचा खून करुन फरार असलेल्या एका युवकाला वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने काल दि.23 नोव्हेंबर रोजी जेरबंद करून पुढील कार्यवाहीसाठी लिंबगाव पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे.
वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार विजयकुमार नंदे, बालाजी कदम, शरदचंद्र चावरे, संतोष बेलुरोड, व्यंकट गंगुलवार आदींना लिंबगाव येथील गुन्हा क्रमांक 113/2019 मधील फरार गुन्हेगार दिपक उर्फ छक्या विनोद भोकरे (21) यास महाराणा प्रताप चौकातून पकडून आणण्याची सुचना केली. दोन वर्षापुर्वी रणदिपसिंघ उर्फ राणा मुखत्यारसिंघ रतोके (30) यांचा खून करून त्यांचे प्रेत हस्सापूर येथील वळणरस्त्यावर टाकण्यात आलेले होते. त्याप्रकरणीचा हा गुन्हा होता. त्यानुसार वजिराबाद गुन्हे शोध पथकाचे सर्व सदस्य महाराणा प्रातप चौकात पोहचले आणि त्यांनी तेथे दिपक उर्फ छक्याला ताब्यात घेतले. याप्रसंगी गुन्हेगाराकडे असलेल्या एका मोबाईलची तपासणी केली असता तो मोबाईल झारखंड राज्यातील व्यक्तीचा होता आणि चोरलेला होता. याबाबत रेल्वे पोलीस ठाण्यात वेगळा गुन्हा दाखल आहे. दोन वर्षापासून फरार असलेल्या खून प्रकरणातील आरोपीला जेरबंद करणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे आदींनी कौतुक केले आहे.