नांदेड(प्रतिनिधी)-मद्याच्या प्रभावात आपल्या आई-वडीलांना जबर मारहाण केल्यामुळे 65 वर्षीय वडीलांचा मृत्यू झाला. आई गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे. हदगाव पोलीसांनी मारहाण करणाऱ्या पुत्राला आज 24 नोव्हेंबर रोजी हदगाव न्यायालयात हजर केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुविधा पांडे यांनी वडीलांचा मारेकरी संजय गंगाळे यास तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
आपली माहेरी गेलेली पत्नी परत आणून द्या या कारणासाठी मद्य प्राशन करून त्याच्या प्रभावात वृध्द आई-वडीलांना त्यांचा पुत्र संजय गंगाळे याने मारहाण केली. संजय गंगाळेला तीन आपत्य आहे. तीन महिन्यापुर्वी संजयच्या त्रासाला कंटाळून त्याच्या पत्नीने पलायन केलेले आहे. सोमवारी मद्याच्या नशेत आपल्या वडीलसोबत त्याने वाद घातला आणि आपली पळून गेलेली पत्नी परत आणून द्या यावरून वडील आणि आई दोघांना मारहाण केली. या मारहाणीत संजय गंगाळेचे वडील माधव परसराम गंगाळे (65) रा.तळणी ता.हदगाव यांचा मृत्यू झाला. संजय गंगाळेची आई गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे.

हदगाव पोलीसांनी आई-वडीलांना मारहाण करून वडीलांचा खून करणाऱ्या संजय गंगाळेला अटक केली. त्याच्याविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला. आज 24 नोव्हेंबर रोजी पोलीस उपनिरिक्षक दिपक फोलाने यांनी अटक असलेल्या संजय गंगाळेला हदगावचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकरी सुविधा पांडे यांच्यासमक्ष हजर करून पोलीस कोठडी मागितली. पोलीस उपनिरिक्षक फोलाने यांची विनंती मान्य करून पित्याचा खून करणाऱ्या संजय गंगाळेला तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.