नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील 32 जिल्ह्यांमधील 105 नगर पंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणुक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आल्या आहेत . याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील नायगाव, अर्धापूर आणि माहूर या नगरपंचायतीची निवडणुक होणार आहे. आचार संहिता काल दि.24 नोव्हेंबरपासूनच लागू झाली आहे.
महाराष्ट्रातील नांदेड, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 32 जिल्ह्यांमधील 105 नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अधिसुचना जारी झाली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात नायगाव, माहूर आणि अर्धापुर या नगरपंचायतींचा समावेश आहे. सण 2021 मध्ये आणि 2020 मध्ये ज्या नगरपंचायतींचा कार्यकाळ समाप्त होत आहे आणि कांही नगरपंचायती नवनिर्मित आहेत अशी एकूण 105 ही संख्या आहे.
या निवडणुकीसाठी संबंधीत निवडणुक निर्णय अधिकारही आणि त्या-त्या नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व काम पाहतील अशी माहिती डॉ.विपीन यांनी दिली. नगर पंचायतीच्या प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणीत करून प्रसिध्द करण्याचा दि. 29 नोव्हेंबर 2021 असा आहे. 30 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुक कार्यक्रम जारी करायचा आहे. 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर नामनिर्देशनपत्र आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर भरण्याकरीता उपलब्ध असतील. 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर, 4 डिसेंबर व 5 डिसेंबर शनिवार आणि रविवार आहे ते दिवस सोडून इतर दिवशी नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येतील. नामनिर्देशन पत्राची छाननी 8 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल. वैधरित्या नामनिर्देशीत झालेल्या उमेदवारांची याती 8 डिसेंबर रोजी प्रसिध्द होईल. उमेदवारी मागे घेण्याचा दिवस 13 डिसेंबर 2021 दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. अपील असल्यास त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी अर्थात 16 डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेतले जाऊ शकतील. निवडणूक चिन्ह नेमूण देण्याचा दिवस उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर लगतच्या दिवसानंतर होईल. आवश्यक झाल्यास 21 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेदरम्यान निवडणुक मतदान होईल. मतमोजणीचा निकाल जाहीर करणे यासाठी 22 डिसेंबर 2021 ही तारीख देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात निकाल प्रसिध्द करण्यासाठी कलम 19 मधील तरतुदीप्रमाणे केला जाईल.
नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे एकूण 21 हजार 890 मतदार आहेत, अर्धापूर येथे 21 हजार 890 मतदार आहेत, माहूर येथे 9 हजार 770 मतदार आहेत. या निवडणुकीदरम्यानच्या आचारसंहितेनुसार त्या ग्राम पंचायत संदर्भाने प्रभाव पडेल अशी कोणतीही घोषणा जिल्ह्यात कोणत्याही राजकीय व्यक्तीला करता येणार नाही. तसेच मुळ आचार संहिता ही त्या-त्या नगरपंचायत कार्यक्षेत्रात राहिल. कोविड नियमावलीनुसारच या नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया पार पडेल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी दिली. या पत्रकार परिषदेत निवडणुक निर्णय अधिकारी शैलेश खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी आणि जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांची उपस्थिती होती.
राज्यात 105 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर ; नांदेड जिल्ह्यातील माहूर, नायगाव आणि अर्धापूर