
नांदेड (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व माध्यमाच्या ग्रामीण भागातील 3115 शाळा व शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवीच्या 334 शाळा उद्या दि. 1 डिसेंबर 2021 रोजी सुरू होणार असून कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याचे निर्देश नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण समितीचे सभापती संजय बेळगे यांनी आज शाळांना दिले आहेत.
महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग असलेल्या सर्व शाळा सुरू करण्याचे परिपत्रक दि. 29 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसृत केले आहे. या परिपत्रकानुसार ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी चे वर्ग असलेल्या सर्व शाळा ,इयत्ता पहिली ते सातवीच्या शहरी भागातील सर्व शाळा सुरू करण्यात येणार आहेत .नांदेड जिल्ह्यात इयत्ता पहिली ते चौथी साठी 205020 विद्यार्थी असून इयत्ता पहिली ते सातवीसाठी 86048 विद्यार्थी आहेत.शाळा सुरू करताना आवश्यक ती पूर्वतयारी करावी.
शाळेचे निर्जंतुकीकरण करणे, पालकांनी शाळेत जाताना शासनाने निर्देशित केलेल्या सूचनांचे पालन करणे, सर्वांनी मास्क परिधान करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट अंतर ठेवणे या बाबी कटाक्षाने पाळाव्यात. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे का याची खातरजमा करावी आणि लसीकरण केले नसेल तर ते तात्काळ करून घ्यावे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात येऊ नये .जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दोन सत्रांमध्ये आणि एका बाकावर एकच विद्यार्थी दोन बेंचमध्ये विशिष्ट अंतर आणि वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी असावेत. बऱ्याच दिवसानंतर विद्यार्थी शाळेत येत असल्यामुळे त्यांचे मनोबल वाढण्यासाठी प्रयत्न करावा असे निर्देश शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी दिले आहेत. शाळा नियमित सुरू झाल्यानंतर सर्व नियमांचे पालन होत आहे किंवा नाही याबाबत पर्यवेक्षकीय अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी खातरजमा करावी, शाळांना नियमित भेटी देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे असे आवाहन शिक्षणाधिकारी सविता बिरगे केले आहे.दरम्यान सर्व शाळा सुरू करण्याची पूर्ण तयारी शाळा स्तरावर करण्यात आली आहे.