शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर

नांदेड (प्रतिनिधी) – राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी व शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग 1 डिसेंबर 2021 पासून सुरु करण्यात येणार होते. नांदेड जिल्ह्यात लसीकरणासाठी विशेष मोहिम 12 डिसेंबर 2021 पर्यंत राबवून लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढल्याचा आढावा घेऊन 13 डिसेंबर 2021 पासून ग्रामीण भागातील इयत्ता 1 ली ते 4 थी व शहरी भागातील इयत्ता 1 ली ते 7 वीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

शासन निर्णयानुसार सर्व शिक्षकांचे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा  परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी याबाबत आढावा घेऊन शाळा सुरु करण्याबाबतच्या आवश्यक त्या सूचना संबंधितांना करण्याचे निर्देश दिले.

 

जिल्ह्यात कोविड-19 लसीकरणाची स्थिती व कोविड-19 चा नवीन व्हेरिएंट ओ-मायक्रॉनची भिती सर्वत्र निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील लसीकरणाची स्थिती पाहता शासन परिपत्रकानुसार शाळा सुरु करण्यासाठी उचित होणार नाही. साथरोग अधिनियम 1897 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, महसूल, वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनर्वसन विभाग मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार ज्या वर्गाची शाळा सद्यस्थितीत सुरु आहे ती पूर्वी प्रमाणेच सुरु राहतील. परंतू शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरातील 18 वर्षावरील सर्व व्यक्तींचे प्रथम किंवा द्वितीय डोस झाल्याचे प्रमाणपत्र घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत प्रत्यक्ष प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच 13 डिसेंबर पासून इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या घरातील 18 वर्षावरील सर्व व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाल्याची खात्री शालेय प्रशासनाने करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *