नांदेड(प्रतिनिधी)-फटाका व्यापाऱ्याच्या तक्रारीवरुन दाखल झालेल्या जीवघेणा हल्ला प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.के.गौतम यांनी कांही दिवसांसाठी दिलेला अंतरीम(तात्पुरता) अटकपुर्व जामीन काल दि.30 नोव्हेंबर रोजी संपला आणि न्यायालयाने गौतम जैनचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
दि.3 नोव्हेंबर रोजी नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात धनराज बद्रीनारायण मंत्री यांच्या तक्रारीवरुन दत्तात्रय पांडूरंग अनंतवार, पवन जगदीश बोरा(शर्मा) आणि गौतम नरसिंगदास हिरावत उर्फ जैन या तिघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 307 सह अनेक कलमांना जोडून गुन्हा क्रमांक 397/2021 दाखल झाला. या प्रकरणात पोलीसांनी पवन जगदीश बोरा उर्फ शर्माला अटक केली. त्याच्याकडून जिवे मारण्याचा प्रयत्न करतांना वापरलेले पिस्तुल व जवळपास 12 रिकामे काडतूस जप्त केले. सध्या तो न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरूंगात आहे.
याप्रकरणातील दुसरे दोन दत्तात्रय पांडूरंग अनंतवार याने आणि गौतम जैनने जिल्हा न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज क्रमांक 893/2021 आणि 899/2021 दाखल केले. यामध्ये 18 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने दत्तात्रय पांडूरंग अनंतवारचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्या अगोदर 17 नोव्हेंबर रोजी गौतम नरसिंगदास हिरावत उर्फ जैन यांना न्यायालयाने तात्पुरता अर्थात अंतरिम जामीन दिला होता. त्या दिवशीच्या आदेशात न्यायालयाने असे लिहिलेले आहे की, 30 नोव्हेंबर रोजी जामीन अर्जाची सुनावणी होईल तेंव्हा गौतम जैनने न्यायालयात हजर राहायचे आहे.
काल दि.30 नोव्हेंबर रोजी या गुन्ह्याचे तपासीक अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे न्यायालयात हजर होते. झालेल्या या सुनावणीदरम्यान गौतम जैन न्यायालयात हजर नव्हता. सरकारी वकील ऍड. यादव तळेगावकर यांनी मांडलेला युक्तीवाद ग्राह्य मानुन न्या.एन.के.गौतम यांनी गौतम नरसींगदास हिरावत उर्फ जैनचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या प्रकरणात गौतम जैनच्यावतीने ऍड. एन.जी. खान यांनी बाजू मांडली होती.
समाजातील चुकीच्या प्रकारांविरुध्द झटणाऱ्या गौतम जैनला न्यायालयाने अटकपुर्व जामीन नाकारला