भारतीय जनता पार्टीला जशास तसे उत्तर देवू-कॉंगे्रस नेते सचिन सावंत

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यास केलेल्या सुरूवातीला आम्ही जशास तसे उत्तर देवू असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंगे्रसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केले.
आज दि.8 डिसेंबर रोजी नांदेड येथील कॉंगे्रेस कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आलेले कॉंगे्रस सरचिटणीस सचिन सावंत यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर जिल्हा बॅंकेचा आढावा घेतला. महानगरपालिकेचा विकास आराखडा अवलोकित केला आणि त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी महापौर जयश्री पावडे, आ.अमरनाथ राजूरकर,आ.मोहनराव हंबर्डे, माजी मंत्री डी.पी.सावंत, सुभाष वानखेडे, किशोर सवामी, मुन्तजिबोद्दीन आदी हजर होते.
याप्रसंगी पुढे बोलतांना सचिन सावंत म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या लोकांमध्ये सत्याला सामोरे जाण्याचे नैतिक धैर्य नाही जे आमच्यात आहे. आम्ही आता भारतीय जनता पार्टीला जशास तसे उत्तर देण्याच्या तयारीत आहोत. कारण त्यांनी महाविकास आघाडी नेत्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचे काम सुरू केले आहे. मागील दोन वर्ष महाविकास आघाडी पाडून टाकण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. नांदेडच्या देगलूर पोटनिवडणुकीतील कॉंगे्रसचा विजय हा पुर्नआगमनाचा बिगुल असल्याचे सावंत यांनी सांगितले. नांदेड हा राज्यातील सर्व कॉंगे्रस कार्यकर्त्यांसाठी उर्जा देणारा स्त्रोत आहे असे वक्तव्य त्यांनी केले. केंद्र शासनाच्या एकंदरीत वागणूकीने देशातील जनता त्रस्त झाली आहे. एसबीआय बॅंकेचे कर्ज वाटप जबाबदारी आता बॅंकेने अदानी यांना दिली आहे. हे किती दुर्देवी असल्याचे सावंत म्हणाले.
रशियाचे प्रमुख ब्लादीमिर पुतीन यांच्या पॅर्टनवर मोदी चालत आहेत.ज्यानुसार कार्पोरेट जगताने विरोधकांना कांहीच आर्थिक मदत करू नये, सरकारचा जाहिरनामा त्यांनी आपल्या कामकाजात वापरावा असा तो पॅर्टन आहे. आरक्षणाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केले आहे. आता भाजपाची पापे चव्हाट्यावर आम्ही आणणार आहोत. मुस्लीम आरक्षण, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण या सर्व संदर्भाने आम्ही सकारात्मक असून त्या बाबत लवकरात लवकर काम करणार आहोत असे सावंत म्हणाले. एस.टी.विभाग जवळपास 12 हजार कोटीच्या नुकसानीत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनाशी आम्ही सुध्दा सकारात्मक विचार करतो पण त्यांनी भाजपच्या नादी लागून आपले नुकसान करून घेवू नये असे सचिन सावंत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *