गुरुद्वारा बोर्डाच्या 12 जून आणि 13 जून 2019 च्या बैठका महसुल मंत्र्यांनी रद्द केल्या

आक्षेपक आणि समर्थकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला
नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा बोर्डावर प्रशासकीय समितीची स्थापना झाल्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या बैठकीवर गुरूद्वारा बोर्डाच्या कांही सदस्यांनी आक्षेप उचलल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी या आक्षेपाचा निर्णय महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केला आणि त्या दोन बैठका रद्द ठरवल्या. या संबंधाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका क्रमांक 949/2021 च्या निर्णयाला आधिन राहुन महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाची माहिती मिळाल्यानंतर आक्षेप दाखल करणाऱ्या सदस्यांसह अनेक जणांनी सचखंड श्री हजुर साहिबसमोर फटाके उडवून आनंद व्यक्त केला.
दि.8 मार्च 2019 रोजी शिख गुरूद्वारा सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब मंडळाचे गठण करण्यात आले होते. नवनियुक्त मंडळाची पहिली बैठक 12 जुन 2019 रोजी आणि दुसरी बैठक 13 जून 2019 रोजी घेण्यात आली. या दोन्ही बैठका गुरूद्वारा बोर्ड कायदा 1956 मधील नियमावलीनुसार झाल्या नाहीत असा पहिला आक्षेप बोर्ड सदस्य स.मनप्रितसिंघ कुंजीवाले आणि सरदार गुरमितसिंघ महाजन यांनी 11 जून 2019 रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत शासनाकडे नोंदवला. सरदार गुरचरणसिंघ उत्तमसिंघ घडीसाज, सरदार जगबिरसिंघ हरीसिंघ शाहु आणि सरदार भागिंदरसिंघ गुरचरणसिंघ घडीसाज या तिन सदस्यांनी आपल्या आक्षेप 3 जुलै 2019 रोजी नोंदवला. गुरूद्वारा बोर्ड कायद्यातील अनेक कलमानुसार अत्यंत तांत्रिक दृष्ट्या उचलेल्या आक्षेपांची नोंद महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या 8 पानी निकालात घेतली आहे. सोबत गुरूद्वारा बोर्डाच्यावतीने गुरूद्वारा बोर्ड अधिक्षकांनी दिलेल्या लेखी सादरीकरणाचे अनेक मुद्दे निकालात लिहिलेले आहेत.
या युक्तीवादामध्ये सदस्यांनी उचलेले आक्षेप हे कायदेशीर आणि गुरूद्वारा बोर्ड अधिनियम 1956 च्या विविध तरतुदीनुसार आहेत. गुरूद्वारा बोर्ड अधिक्षकांनी दिलेल्या उत्तरात बोर्ड सदस्य बोर्डाच्या कामात हस्तक्षेप करून त्रास देत आहेत असे लिहिले होते. दाखल केलेल्या सर्व युक्तीवादाचा परिपुर्ण विचार करून महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 8 डिसेंबर 2021 रोजी अर्थात जवळपास 22 महिन्यानंतर निकाल दिला आणि त्यात दि.12 जून 2019 आणि 13 जून 2019 रोजी झालेल्या गुरूद्वारा बोर्डाच्या बैठका रद्द ठरवल्या. हा निर्णय उच्च न्यायालयात रिटयाचिकेच्या निर्णयाला आधिन राहुन देण्यात आला आहे असे लिहिले आहे.
या निर्णयाची माहिती 9 डिसेंबर रोजी नांदेडमध्ये प्राप्त झाल्यानंतर आक्षेप घेणारे गुरूद्वारा बोर्ड सदस्य सरदार मनप्रितसिंघ कुंजीवाले, सरदार गुरमितसिंघ महाजन, सरदार गुरचरणसिंघ उत्तमसिंघ घडीसाज, सरदार जगबीरसिंघ हरीसिंघ शाहु आणि सरदार भागिंदरसिंघ गुरचरणसिंघ घडीसाज यांनी आणि त्यांच्या अनेक समर्थकांनी सचखंड श्री हजुर साहिब दरबारात आशिर्वाद घेवून गुरूद्वाराच्या बाहेर फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *