नांदेड(प्रतिनिधी)-एका विवाहितेचा हुंड्यासाठी छळ करून तिचा नॉयलॉन दोरीने गळाआवळून तिचा खून केल्याचा प्रकार हदगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. दुसऱ्या एका विवाहितेला 2 लाख रुपये मागणी करून तिचा छळ करणाऱ्या सासरच्या मंडळीविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विठ्ठल गंगाराम होरे रा.खरबडा ता.पुर्णा जि.परभणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 डिसेंबर रोजी डोंगरगाव ता.हदगाव येथे शोभा राधेशाम मुलगिर (27) या विवाहितेला माहेरहुन 50 हजार रुपये घेवून ये असा तगादा लावून तिच्या सासरच्या मंडळीने तिचा शारीरिक व मानसीक दळ करत नॉनलॉन दोरीने तिचा गळा आवळून तिचा खून केला आहे. हदगाव पोलीसांनी या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक संजय गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे. पोलीसांनी त्वरीत प्रभावाने शोभाच्या सासरच्या मंडळीतील तिचा नवरा राधेशाम मुलगिर आणि त्याच्या वडीलांना ताब्यात घेतले होते. पण राधेशामच्या वडीलांची प्रकृती बिघडल्यामुळे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. राधेशाम मुलगिरला अटक झालेली आहे.
दुसऱ्या एका घटनेत 29 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरुन सन 2013 ते 2021 अशा 7 वर्षात तिच्या सासरच्या मंडळीने जेसीबी खरेदी करण्यासाठी तिच्या माहेरहुन तिने दोन लाख रुपये आणावे असे सांगून शिवीगाळ, मारहाण, उपाशी ठेवून, तिचा शारिरीक व मानसीक छळ केला. पहिली पत्नी असतांना दुसरे लग्न केले. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार चक्रधर हे करीत आहेत.
एका विवाहितेचा खून; एकीचा छळ