नांदेड(प्रतिनिधी)- 50 हजार रुपयांची खंडणी स्विकारल्यानंतर अटक करण्यात आलेल्या आरटीआय कार्यकर्ता तसेच भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा अध्यक्ष विलास घोरबांड पाटील यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.बी.कुलकर्णी यांनी दोन दिवस,अर्थात १९ डिसेंबर २०२१ पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.14 डिसेंबर रोजी दुपारी लातूर फाटा जवळील एका गॅरेजमध्ये विकास मोहनराव आढाव यांच्याकडून 50 हजार रुपयांची खंडणी स्विकारणाऱ्या विलास पुंडलिकराव घोरबांड पाटील यास सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक आणि त्यांच्या सहकारी पोलीसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 872/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 384 नुसार दाखल झाला. 14 डिसेंबर रोजी पोलीसांनी ताब्यात घेताच विलास घोरबांडची प्रकृती बिघडली म्हणून त्याची रवानगी रुग्णालयात झाली. 16 डिसेंबर रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारातून मुक्त केल्यानंतर या गुन्ह्याचे तपासीक अंमलदार, नायगावचे पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे यांनी विलास घोरबांड याला अटक केली.
आज दि.17 डिसेंबर रोजी अभिषेक शिंदे आणि त्यांच्या सहकारी पोलीसांनी विलास घोरबांडला न्यायालयात हजर केले. न्यायालयात अभिषेक शिंदे यांनी सांगितले की,विलास पाटील यांच्या ध्वनीचे नमुने घेणे आहे,तसेच इतर कोणी आरोपी याच्या सोबत सहभागी आहे काय ? याची तपासणी करणे आहे,त्यासाठी पोलीस कोठडी देणे आवश्यक आहे.केलेल्या सादरीकरणाला ग्राह्य मानुन न्या.कुलकर्णी यांनी विलास घोरबांडला दोन दिवस,अर्थात १९ डिसेंबर २०२१ पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
आरटीआय कार्यकर्ता विलास पाटील दोन दिवस पोलीस कोठडीत