नांदेड(प्रतिनिधी)-हैद्राबाद रस्त्यावरील एका ढाब्यावर नांदेड ग्रामीण पोलीसांनी छापा टाकल्यावर राडा झाला. या प्रकरणात वडील आणि दोन मुलांना पोलीसांवर हल्ला या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.
काल दि.18 डिसेंबर रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक हे हैद्राबाद रस्त्यावरील एका ढाब्यावर गेले. गुन्हे शोध पथकाच्या पोलीसांकडे बंदुका पाहुन बोलणे वाढले आणि त्यातून पुढे राडा झाला. यावेळी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे, पोलीस अंमलदार शिवा पाटील आणि अनेक पोलीस अंमलदार त्या ठिकाणी हजर होते. तपासणी काय आहे यावरून वाद सुरू झाला. आणि तो राड्यात बदलला असे त्या ठिकाणचे कांही लोक सांगतात. पुढे हा राडा जास्तच गंभीर झाला. तेंव्हा पोलीसांच्या गाड्या बोलावण्यात आल्या आणि त्यानंतर त्या ढाब्याचे मालक बालाजी संभाजी पांचाळ, त्यांचे पुत्र शैलेश उर्फ ओमकार आणि अनिरुध्द अशा तिघांना पोलीसांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले. तेथे बालाजी पांचाळ आणि त्यांच्या मुलांसोबत शब्दांची झालेली देवाण-घेवाण कुठे तरी ट्रकपासून वेगळी झाली आणि त्यानंतर पांचाळ पिता-पुत्रांना बराच प्रसाद मिळाला अशी माहिती सांगण्यात आली.
पोलीस अंमलदार शिवा पाटील यांच्या तक्रारीवरुन बालाजी पांचाळ त्यांचे पुत्र शैलेश आणि अनिरुध्द या तिघांविरुध्द सरकारी कामात अडथळा, पोलीसांवर हल्ला आदी सदरांखाली गुन्ह्याची नोंद झाली. पोलीस उपनिरिक्षक गणेश होळकर यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला. आज न्यायालयाने त्या तिघांना न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. घडलेला प्रकार अनेकांनी पाहिलेला आहे आणि ऐकलेला आहे.
हैद्राबाद रस्त्यावर नांदेड ग्रामीण पोलीस आणि ढाबा चालकात झाला राडा