प्रल्हाद दे. आगबोटे
कंधार- तालुक्यातील बाचोटी येथील शहिद जवान बालाजी श्रीराम डुबुकवाड यांच्या पार्थिव देहावर बाचोटी येथे सोमवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
रविवारी श्रीनगर येथून विमानाने त्यांचे पार्थिव रात्री उशिरा पुणे येथे येणार आहे. पुणे येथे श्रद्धांजली अर्पण करून तेथून वाहनाद्वारे कंधार मार्गे त्यांच्या मूळगावी बाचोटी येथे आणून येथील त्यांच्या शेतात सोमवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती कंधारचे तहसीलदार संतोष कामठेकर यांनी दिली.
भारतीय सैन्य दलाचे टी. ए. १०१ जवान बालाजी श्रीराम डुबुकवाड (वय ३२) सीमा सुरक्षा दलात जम्मू-काश्मीर येथे कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना भारत मातेचे रक्षण करताना जम्मु कश्मीरमधील कुपवाडा, जिल्हा राजुरी येथे १८ डिसेंबर रोजी शनिवारी ते शहीद झाले.
त्यांचा अंत्यविधी उदया दिनांक 20 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 1:00 वाजता त्यांचे जन्म गावी बाचोटी ता. कंधार जि. नांदेड येथे शासकीय इतमामात होणार आहे.