गुरुद्वारा बोर्ड बैठका रद्द करणारा महसूल मंत्र्यांच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थागिती 

नांदेड,(प्रतिनिधी)-दि.८ डिसेंबर रोजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नांदेड येथील गुरुव्दारा बोर्डाच्या झालेल्या दोन बैठका रद्द करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरुध्द उच्च न्यायालयातील औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती एन.बी.सूर्यवंशी यांनी महसूल मंत्र्याच्या आदेशाला स्थगिती दिली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे.
८ मार्च २०१९ रोजी गुरुव्दारा बोर्डाचे गठन करण्यात आले. त्यावेळी अध्यक्ष पदावर स.भूपिंदरसिंघ मनहास यांची नियुक्ती झाली आणि त्यानंतर त्यांनी गुरुव्दारा बोर्डाची पहिली बैठक १२ जून २०१९ रोजी आणि दुसरी बैठक १३ जून २०१९ रोजी घेतली. या बैठका विरुध्द उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल होत्या त्यातील याचिका क्रमांक ९४९/२०२१ च्या आदेशाला अधिन राहून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा निर्णय दिला होता.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निर्णयाविरुध्द गुरुव्दारा बोर्डाचे उपाध्यक्ष गुरींदरसिंघ बावा,सरदार नौनिहालसिंघ जहागीरदार आणि इतरांनी उच्च न्यायालयात रिट याचिका क्र.१४३४०/२०२१ दाखल करुन महसूल मंत्र्यांच्या आदेशाला स्थगिती मागितली. या प्रकरणात गुरींदरसिंघ बावा आणि इतरांच्या वतीने अ‍ॅड.राजेंद्र देशमुख यांनी युक्तीवाद केला. त्यांना अ‍ॅड.मनप्रितसिंघ ग्रंथी यांनी सहकार्य केले. निर्णय देताना न्यायमूर्ती एन.बी.सूर्यवंशी यांनी महसूल मंत्र्यांनी ८ डिसेंबर रोजी गुरुव्दारा बोर्डाच्या रद्द केलेल्या दोन बैठकांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *