
नांदेड (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिलांच्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा ऍस्ट्रोटर्फ मैदानावर रात्री प्रकाशझोतात होणार आहेत. नांदेडच्या जनतनेे या स्पर्धांना प्रतिसाद देवून आंतर राष्ट्रीय स्तराच्या सुविधांसह या कबड्डी स्पर्धांचा आनंद घ्यावा असे आवाहन स्वारातीमचे कुलगुरू डॉ.उध्दव भोसले यांनी केले आहे.
पश्चिम विभागीय विद्यापीठांच्या कक्षेत महाराष्ट्र , मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि गोवा हे पाच राज्य येतात. दि.27 डिसेंबर रोजी या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दुपारी 3 वाजता क्रिडा विभागाच्या ऍथलॅटिक्स ट्रकवर होणार आहे. या उद्घाटनाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ.उध्दव भोसले, उद्घाटक आंतरराष्ट्रीय कबड्डी पटू शकुंतला खटावकर आहेत. या कार्यक्रमात माजी शिक्षण मंत्री कलमकिशोर कदम, जिल्हाधिकारी डॉ.विपीन, प्र.कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभणार आहे. या स्पर्धेमध्ये गोवा वगळता चार राज्यांच्या विद्यापीठ संघांनी नोंदणी केली आहे. त्यात महाराष्ट्र-11, मध्यप्रदेश-13, गुजरात-15, राजस्थान-17 अशा एकूण 56 संघांनी नोंदणी केली आहे. या सर्व संघांचे खेळाडून 672 होणार आहेत. या सर्वांच्या सर्व भौतिक सुविधांचा विचार करून त्यांच्यासाठी राहण्याची आणि जेवण्याची उत्कृष्ट सोय करण्यात आली आहे. या स्पर्धांचे थेट प्रक्षेपण युट्युब लाईव्हवर सुध्दा होणार आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऍस्ट्रोटर्फवर हे कबड्डी सामने विद्यापीठाच्या इनडोअर स्टेडियममध्ये होणार आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणफलक यात जोडण्यात आले आहेत. नांदेडकरांना अशा स्पर्धा पाहण्याची संधी प्रथमच उपलब्ध होणार आहे तेंव्हा जनतेने या स्पर्धांचा लाभ घ्यावा असे आवाहन कुलगुरू डॉ.उध्दव भोसले यांनी केले आहे. हे सामने रात्री प्रकाशझोतात होणार आहेत.
या आंतरराष्ट्रीय स्तराच्या आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धा महिलाचा पारितोषक वितरण समारंभ 30 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता इनडोअर स्पोर्टस् हॉलमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.उध्दव भोसले असतील या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, दक्षीणमध्ये रेल्वेचे व्यवस्थापक उपेंद्रसिंघ, प्र.कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, अर्जुन पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय कबड्डी पटू राजु भावसार, छत्रपती पुरस्कार विजेते कबड्डी पटू गणेश शेट्टी यांची उपस्थिती राहणार आहे.
या पत्रकार परिषेदत प्र.कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे, डॉ.विठ्ठलसिंह परिहार, जनसंपर्क अधिकारी डॉ.अशोक कदम यांची उपस्थिती होती.
परिस्थितीनुसार शैक्षणिक तयारी-कुलगुरू
कबड्डी स्पर्धांची माहिती देतांना कुलगुरू डॉ.उध्दव भोसले म्हणाले जीवनात शिक्षणासोबत खेळ आणि सांस्कृतीक कार्यक्रमांना प्रत्येकाने महत्व दिले पाहिजे. ज्यामुळे आपल्या शरिरावरील आपले नियंत्रण योग्य राहते आणि मन प्रसन्न राहते. ज्या प्रमाणे शिक्षण आवश्यक आहे. त्याप्रमाणेच खेळ आणि संस्कृती आपल्या जीवनाचा अभिन्न भाग आहे. याप्रसंगी देशात आणि जगात सध्या सुरू असलेल्या ओमायक्रॉन या विषाणुच्या परिस्थितीत स्वारातीम विद्यापीठा अंतर्गत चालणाऱ्या 357 महाविद्यालयांमध्ये परिस्थितीअनुरूप विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची तयारी विद्यापीठ घेत आहे. त्यात ऑनलाईन शिक्षण, ऑफलाईन शिक्षण, ऑनलाईन परिक्षा आणि ऑफलाईन परिक्षा याबाबत सुध्दा विद्यापीठ परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहे असे कुलगुरू डॉ.उध्दव भोसले म्हणाले.