
नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदा बायोडिझेलवर पुन्हा एकदा काल रात्री धाड टाकली. महसुल पथकाने तेथून 5 ट्रक जप्त करून आणले आहेत. याबद्दलची तक्रार अद्याप वृत्तलिहिपर्यंत दाखल झाली नव्हती.
दि.28 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता जिल्हाधिकारी डॉ.विपीन आपल्या अनेक अधिकाऱ्यांसह कांदा मार्केटजवळ पोहचले. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या एका खाडाखोड केलेल्या नंबरच्या ट्रकमध्ये अत्यंत नियोजितपणे पेट्रोलपंपावर असते तसे मोजमाप करण्याचे यंत्र लावलेले होते. सोबतच त्या ठिकाीण पाच ट्रक क्रमांक एम.एच.26 ए.डी.2519, एम.एच.18 बी.7208, एम.एच.04 सी.818 (818 च्या अगोदर एक नंबर आले पण तो मिटवलेला आहे.) एम.एच.12 एन.एक्स.8792 आणि एक नोंदणी क्रमांक नसलेला ट्रक असे 5 ट्रक जप्त करून आणले आहेत. हे सर्व ट्रक सध्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रांगणात उभे आहेत.
जिल्हाधिकारी डॉ.विपीन हे या ठिकाणी रात्री 11 वाजता पोहचले. त्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्यांना या सर्व बायोडिझेलमधील अवैध बाबी जमविण्यासाठी 29 डिसेंबरचे पहाटे 4 वाजले. याप्रसंगी तहसीलदार, पोलीस उपअधिक्षक हजर होते. आज दि.29 डिसेंबर रोजी वृत्तलिहिपर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती. महसुल विभागाची अधिकारी ही तक्रार देणार आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे.

रात्री 12 वाजता नवीन पोलीस निरिक्षक
दोन दिवसापुर्वी नांदेड ग्रामीणचे कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब हे सुट्टीवर गेले होते. त्यामुळे या पोलीस ठाण्याचा कारभार त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे होता. प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार सध्या नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री 12 वाजता पाठविण्यात आले आहे. त्यांनी सध्या नांदेड ग्रामीणचा पदभार तात्पुरता स्विकारला आहे. अशोकरावजी घोरबांड साहेबांकडे सुध्दा हा पदभार तात्पुरताच होता.