नांदेड(प्रतिनिधी)-एका पेट्रोलपंपचालकाला तलवारीचा धाक दाखवून पळालेल्या एका व्यक्तीला रामतिर्थ पोलीसांनी गाडीसह पडले आहे.त्या गाडीत एका गावठी पिस्तुलसह चार जिवंत काडतुसे सापडली आहेत. त्याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
पोलीस अंमलदार शेख मुक्तार शेख हैदर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 डिसेंबर रोजी त्यांची ड्युटी नरसी गावात नाईटगस्त असतांना ते काम करत होते. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 1 वाजेच्यासुमारास रामतिर्थचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय जाधव यांनी त्यांना सांगितले की, नायगाव रस्त्यावरील ताटे पेट्रोलपंप येथून एका चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.के.6729 मध्ये बसून गाडी नरसी चौकाकडे येत आहे. या गाडीतील माणसाने ताटे पेट्रोलपंपावर वाद घालून तलवारीचा धाक दाखवला आहे. नरसी चौकात मी आणि पोलीस अंमलदार रमेश राठोड यांनी ती गाडी थांबवली त्यातील माणसाचे नाव संतोष शंकर शिंदे (35) रा.शिंदेगल्ली नायगाव असे होते. त्याच्या गाडीची तपासणी केली असता एक गावठी पिस्टल आणि चार जीवंत काडतुस आणि एक तलवार असे साहित्य सापडले. पोलीसांनी गाडीसह 5 लाख 76 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे आणि संतोष शंकर शिंदे विरुध्द भारतीय हत्यार कायद्याची कलमे 3/25, 4/25 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
नरसी चौकात एका चार चाकी वाहनातील व्यक्तीकडून गावठी पिस्तुल आणि चार जीवंत काडतुसे पकडली