नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागाकरीता अनाधिकृत भुखंड आणि त्यावरील अनाधिकृत बांधकाम करण्यासाठी शुल्क निश्चिती करण्यासाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास समिती स्थापन करण्याचे आदेश नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी जारी केले आहेत.
नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेले अनाधिकृत भुखंड आणि त्या भुखंडावरील बांधकाम नियमित करण्यासाठी एक समितीची घोषणा केली आहे. या समितीमध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी लतिफ पठाण-अध्यक्ष, सहाय्यक संचालक नगर रचना दिलीप सरपाते-सदस्य सचिव आणि सदस्य म्हणून सात जणांची नावे आहेत. त्यात मनपाचे सहाय्यक संचालक नगर रचना एन.एच.गर्जे, नांदेड तहसीलदार किरण अंबेकर, मुदखेड तहसीलदार सुजित नरहरे, सहाय्यक नगर रचना नजरुल इस्लाम, उपअभियंता मनपा प्रकाश कांबळे, मनपा अभियंता मनोहर दंडेकनिष्ठ, उपअधिक्षक भुमिअभिलेख निलेश उंडे यांचा समावेश आहे.
या समितीने अवैध भुखंडांवरील बांधकाम नियमित करण्यासाठी शुल्क निश्चिती, आदर्श कार्यपध्दती, आवश्यक नमुने तयार करावेत. प्राप्त होणाऱ्या अर्जांवर कार्यवाही करून अभिलेखाचे जतन करण्यासाठी काम करावे. हे काम करत असतांना या सर्व समितीतील अधिकाऱ्यांनी आप-आपल्या विभागात त्यांचे मातहत असणाऱ्या लोकांचा या कामासाठी उपयोग घ्यावा असे या आदेशात जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी लिहिले आहे.