शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सा.बां.ने दिला दुरूस्तीसाठी निधी सुरू आहे नवीन भिंतीचे काम

नांदेड(प्रतिनिधी)-सार्वजनिक बांधकाम विभागाने विविध चार कामांसाठी 1 कोटी 49 लाख 47 हजार 206 रुपयांचा निधी मंजुर केल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहर वजिराबाद येथे लिहिलेल्या कामाच्या नावा व्यतिरिक्त दुसरेच काम सुरू असल्याचे दिसते आहे. या ठिकाणी दिलेला निधी दुरूस्तीसाठी आहे. पण येथे नवीन संरक्षक भिंत तयार होत आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडर नोटीस क्रमांक 42 ए प्रमाणे नांदेड शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहर वजिराबाद, बॉम्ब शोधक  नाशक पथक, नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे आणि पोलीस मुख्यालयात असलेल्या पोलीसांच्या घरासाठी 56 लाख 7 हजार 574 रुपयांचा निधी दिला आहे. त्यात दुरूस्ती या शब्दापलिकडे जावून नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात अगोदरपासूनच सुरक्षा भिंतीत असणाऱ्या पोलीस उपविभागीय कार्यालयाला नवीन सुरक्षा भिंत आतल्याबाजूने उभारण्याचे काम सुरू आहे. या सुरक्षा भिंतीला मुख्यद्वार मात्र वजिराबाद पोलीस ठाण्याच्या सुरक्षा भिंतीच्या आतच आहे. त्यामुळे काय या बद्दल लिहावे हा मोठा प्रश्न आहे. नवीन सुरक्षा भिंत करायचीच होती तर उपविभागीय कार्यालयाला ती भिंत तयार करायला हवी होती. आणि त्या भिंतीचे मुख्यद्वार मुख्य रस्त्यावर महात्मा गांधीजींच्या समोरच तयार करायला हवे होते. नवीन भिंत तयार करणे हा प्रकार दुरूस्तीमध्ये येतो का ? हा प्रश्न या सुरू असलेल्या कामाला पाहुन लक्षात येतो. दुरूस्ती ऐवजी भिंत तयार करण्याचा आदेश कोणी दिला हे मात्र या टेंडर नोटीसमध्ये लिहिलेले नाही. दुरूस्ती आणि नवीन बांधकाम यामध्ये मोठे अंतर आहे हे लिहिण्याची गरजच नाही. तरीपण हे काम सुरूच आहे. कोणी केले, कोणी सांगितले, सुरक्षा भिंतीचा मुख्य आढावा कोणी घेतला. त्याची काय गरज होती. या प्रश्नांची उत्तरे तर शोधणे अत्यंत दुरापास्त बाब आहे.
या निधीशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासाठी वार्षीक देखभाल म्हणून 65 कोटी 39 लाख 10 रुपयांचा निधी मंजुर केला आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन आणि जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे उद्‌वाहन(लिफ्ट) बसविण्यासाठी 11 लाख 16 हजार 103 रुपयांचा निधी दिला आहे. तसेच मुखेड तालुक्यातील नागेली गावातील वाढीव वस्तीसाठी डब्ल्यू बीएम रस्ता बनविण्याकरीता 16 लाख 84 हजार 519 रुपयांचा निधी मंजुर केलेला आहे. ही टेंडर नोटीस 3 ऑक्टोबर 2021 रोजी उघडण्यात आली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहर, वजिराबाद हे काम 9 महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ईमारतीचे देखभाल (मेंटनन्स्‌) 12 महिन्यात करायची आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे 4 महिन्यात लिफ्ट बसवायची आहे आणि नागेली येथील डब्ल्यू बी.एम. रस्ता 4 महिन्यात तयार करायचा आहे.
पोलीस उपविभागागीय अधिकारी कार्यालय शहर , वजिराबाद येथे दुरूस्ती ऐवजी नवीन सुरक्षा भिंत बांधण्यात येत आहे. या चार कामांमध्ये दोन लिफ्ट आहेत. पण इतर कामाची कोणतीही शहानिशा नंतर करता येणार नाही अशीच आहेत. त्यासाठी 1 कोटी 49 लाख 47 हजार 206 रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *