नांदेड(प्रतिनिधी)-मनाठा गावातील शासकीय जमीन एका महिलेला विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता दत्तात्रय पांडूरंग अनंतवार यांच्या विरुध्द दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत नांदेडचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.एन.गौतम यांनी अंतवारचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
दि.9 ऑक्टोबर 2011 रोजी मनाठा गावातील एका महिलेला गट क्रमांक 28 मधील भुखंडाची नोंदणी खरेदीखत आधारावर माहिती अधिकार कार्यकर्ता दत्तात्रय पांडूरंग अनंतवार यांनी विक्री केली. त्यावेळी त्या महिलेने 1 लाख 30 हजार रुपये दिले. पण प्रत्यक्षात या भुखंडासाठी 4 लाख 50 हजार रुपये दिले होते. या बाबची तक्रार त्या महिलेने दिल्यानंतर मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 150/2021 दाखल झाला. यामध्ये भारतीय दंड संहितेची कलमे 420, 465, 467, 468 आणि 471 जोडलेली आहेत. या गुन्ह्याचा तपास मनाठाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे.
याबाबत दत्तात्रय पांडूरंग अनंतवार याने जिल्हा न्यायालयात इतर फौजदारी जामीन अर्ज क्रमांक 985/2021 दाखल करून अटकपुर्व जामीन मागितली. आरोपीच्यावतीने न्यायालयात सादरीकरण करण्यात आले की, त्यांचे आणि त्यांच्या कुटूंबियांचे मुळ समाजामध्ये खालपर्यंत रोवलेले आहेत. तेंव्हा अटकपुर्व जामीन दिला तर न्यायालयाने दिलेल्या सर्व अटी मान्य करू. याविरुध्द सहाय्यक सरकारी वकील ऍड. यादव तळेगावकर यांनी सादरीकरण केले की, खोट्या कागदपत्रांच्या आधारावर हा प्रकार घडलेला आहे आणि सरकारची जमीन 4 लाख 50 हजार रुपये घेवून महिलेला विक्री केलेली आहे. मनाठा ग्रामपंचायतीच्या अभिलेखावर सुध्दा ही जमीन सरकारची आहे. आरोपी अनंतवारच्या उपस्थितीत या गुन्ह्याचा प्रत्यक्ष तपास होणे गरजेचे आहे. त्यासाठी अटकपुर्व जामीन अर्ज नामंजुर करावा. हदगाव भुमिअभिलेख कार्यालयाने दिलेल्या अहवालानुसार दत्तात्रय अनंतवार यांनी विकेलेल्या भुखंडाचा अभिलेख गट क्रमांक 114असा आहे आणि ती जमीन शासनाची आहे. गट क्रमांक 114 शासनाच्या मालकीची जमीन आहे. असा अभिलेख मनाठा पोलीसांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे सविस्तर तपास, रोख रक्कमेची जप्ती आवश्यक आहे. म्हणून अर्जदार/ आरोपी अटकपुर्व जामीन मिळविण्यास पात्र नाही अशी नोंद आपल्या निकालात करून सत्र न्यायाधीश के.एन.गौतम यांनी दत्तात्रय पांडूरंग अनंतवारचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.