नांदेड(प्रतिनिधी)-तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात लाखो रुपयांचा घोटाळा करणारा कारकून पुन्हा एकदा त्याच खुर्चीवर बसण्याच्या तयारी असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. ज्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी या घोटाळेबाज कारकूनाला काढले. त्यांनी या पुर्ननियुक्तीकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
लॉकडाऊनच्या काळात केंद्र शासनाने प्रत्येक माणसाला धान्य मिळालेच पाहिजे या योजनेअंतर्गत धान्य पुरवठा करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांना त्यांच सर्व कमिशन दिले. हे कमीशन वाटप करत असतांना अनेक स्वस्त धान्य दुकानदारांच्या खात्यावर जास्तीचे लाखो रुपये जमा झाले. पुरवठा विभागातील कारकून प्रेमानंद लाठकर ते पैसे चुकीने जमा झाले असे सांगून त्या स्वस्त धान्य दुकानदारांकडून ते पैसे रोखीने परत घेतले. मुळात शासनाचा पैसा थेट खात्यात जमा झाला होता. मग तो परत रोखीने घेण्याचा विषय येतच नसतो. याबाबत ओरड झाली त्यानंतर याप्रकरणात तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे कारकून प्रेमानंद लाठकर यांची त्या विभागातून उचल बांगडी करण्यात आली.
प्रेमानंद लाठकर यांच्या जागी देण्यात आलेल्या व्यक्तीला अजूनही कांही काम होत नाही असे कारण दाखवले जात आहे. काम होत नाही इथपर्यंत ठिक आहे. ते काम कळाले नसेल हेही ठिक आहे. याही पुढे खरे तर प्रेमानंद लाठकरला त्याच जागेवर पुन्हा आणण्याची ही पुर्व तयारी आहे अशी चर्चा तहसील कार्यालयात होत आहे. आज पुरवठा विभागात काम करणारी मंडळी सुध्दा शिधापत्रिकेतील नाव वाढविणे, नाव कमी करणे या बाबत ठरलेल्या दराप्रमाणे काम करत आहेत. मग प्रेमानंद लाठकर यांचे काम त्यांना कसे जमत नाही हा प्रश्न आहे.
पुन्हा एकदा प्रेमानंद लाठकर यांना त्याच खुर्चीवर आणून आपल्या परिने आपल्या भाकरीवर तुप ओढण्याचा हा प्रकार नक्कीच विचारणीय आहे. प्रेमानंद लाठकर साहेब आले तर पुन्हा एकदा पहिले पाढे पंचावन्न असाच प्रकार सुरू होईल. जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी प्रेमानंद लाठकरला त्या ठिकाणावरुन काढले होते. पुन्हा प्रेमानंद लाठकरची नियुक्ती त्याच ठिकाणी होण्याच्या तयारीला ते गतीरोधक नक्कीच लावतील असा विश्र्वास व्यक्त होत आहे.
तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात प्रेमानंद लाठकर हे कारकून पुन्हा येण्याच्या तयारीत