नांदेड(प्रतिनिधी)-माझ्यावर गुन्हा दाखल केला तर आत्महत्या करतो असा संदेश नायगाव तहसीलदाराच्या व्हॉटसऍपवर पाठवणाऱ्या अवैध रेती उत्खन्नन करणाऱ्या दोघांविरुध्द कुंटूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अंतरगाव तलाठी सज्जाचे तलाठी काशीनाथ गुरुनाथ लांडगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.3 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेच्यासुमारास गोदावरी नदी पात्रा लगत असलेल्या शेत गट क्रमांक 328 मौजे मनुर येथे शासनाकडून लिलाव न झालेल्या जागेकडे जाण्यासाठी कच्चा रस्ता बनवून तेथे रेती उत्खन्नन करण्यासाठी एक लोखंडी मशीन लावलेली होती. या मशीनची किंमत 80 हजार रुपये आहे असे पोलीस प्राथमिकीमध्ये लिहिलेले आहे. त्यावेळी अवैध रेती उत्खन्न करणारे गजानन लक्ष्मण शिंदे आणि आनंदा प्रकाश शिंदे या दोघांपैकी कोणी तरी एकाने नायगाव तहसीलदारांच्या व्हॉटसऍप संकेतस्थळावर असा संदेश पाठवला की, माझ्याविरुध्द गुन्हा दाखल केला तर मी आत्महत्या करेल. नायगाव तहसीलदारांच्या लेखी आदेशानंतर तलाठी काशीनाथ लांडगे यांनी ही तक्रार दिली आहे. कुंटूर पोलीसांनी या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 2/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 379, 511,506, 507, 34 आणि गौण खनिज अधिनियमाच्या कलम 4 आणि 21 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार निखाते यांच्याकडे देण्यात आला आहे.
नायगाव तहसीलदारांना वाळूमाफियाकडून आत्महत्येची धमकी