नांदेड,(प्रतिनिधी)- शारदानगर भागात २२ वर्षीय युवकाचा खून करणाऱ्या मारेकऱ्यांना विमानतळ पोलिसांनी अवघ्या काही तासातच जेरबंद केले आहे.खून केल्याचे कारण पहिले तर धक्का बसेल असे ते कारण आहे.
काल दिनांक ५ जानेवारीच्या रात्री ७ वाजेच्या सुमारास राज रेसिडेन्सी शारदानगर येथून आपल्या घराकडे जाणारा युवक विशाल रमेश धुमाळ यास पाठीमागून आलेल्या एक दुचाकीवरील तीन युवकांनी धारदार शस्त्रांनी अनेक जखमा करून हल्ला केला.विशाल आपला जीव वाचवण्यासाठी पळाला तरीही मारेकऱ्यांनी त्यास राज रेसिडेंसी च्या वाहनतळात गाठून त्याचा अखेर खून केलाच.घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांसह मोठा पोलीस फौज फाटा येथे पोहचला. काही वेळात विशालचे वडील रमेश सखाराम धुमाळ आले.तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहून त्यांनी मारेकऱयांना ओळखले.मारेकरी अक्षय उर्फ माधव आनंद हळदे रा.शिवनगर,विनायक तुकाराम सोनटक्के रा.डीमार्ट जवळ,शुभम दिगंबर सोनगावकर रा.मालेगाव असे होते.
रमेश धुमाळ हे कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा येथे लिपिक पदावर कार्यरत आहेत.त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अक्षय हळदे आणि त्यांचा मयत मुलगा विशाल धुमाळ हे दोघे मित्र होते.सात आठ महिन्यांपूर्वी विशाल आणि अक्षय मोटारसायकलवर हदगाव नांदेड असा प्रवास करीत असतांना अपघात झाला होता.त्यात अक्षयच्या हाताला फ्रॅक्चर झाले होते.तेव्हा त्याचा सर्व उपचार खर्च मी केला होता. पण नंतर अक्षय नुकसान भरपाईचे पैसे जास्त हवे असे सांगत होता.पैश्यांची मागणी २० हजारांची होती.पैसे दिले नाहीतर तुला किंवा तुझ्या लहान भावाला मारून टाकतो असर अक्षय विशालला सांगत होता.याच कारणावरून अक्षय उर्फ माधव आनंद हळदे रा.शिवनगर,विनायक तुकाराम सोनटक्के रा.डीमार्ट जवळ,शुभम दिगंबर सोनगावकर रा.मालेगावया तिघांनी माझ्या मुलाचा खून केला आहे.
विमानतळ पोलिसांनी याबाबत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक संजय ननवरे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अधिकारी आणि अमंलदारानी परिश्रम घेत विशाल धुमाळच्या मारेकऱयांना काही तासातच जेरबंद करून सार्थक कामगिरी केली आहे.
पालकांनो आपल्या पाल्याना शिक्षण द्या
घडलेला खून त्यातील मारणारा युवक २१ वर्षांचा आणि मारणारे सुद्धा लहान वयाचे तीन युवक आहेत.पालकांनी आपली बालके कोणासोबत मित्रता ठेवतात,त्यांच्या सोबत कोठे कोठे जातात, करतात याचे निरीक्षण करून त्यांना योग्य मार्गदर्शक सूचना देत दमदार जीवन जगण्याचे शिक्षण देण्याची गरज आहेच हे या घटनेवरून समोर आले आहे.आम्ही या बाबत अनेकदा आमची लेखणी झिजवली आहे.विशालच्या वडिलांचे वय ५० आहे.त्यांच्या जीवनाचा एक आधार मारेकऱ्यांनी समाप्त केला आहे.तीन मारेकरी आता तुरुंगात जाणार आहेत.तेथे तर गुन्हेगारीचे पीएचडी शिक्षण घेतलेले महाभाग त्यांना निष्णात बनवण्यासाठी वाटच पाहात आहेत.मग काय होणार या समाजाचे ? याचा विचार पालकांनी आताच करावा नाहीतर भविष्यातील पिढीला उत्तर देणे अवघड होईल.