नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जोडलेल्या एका महिलेवर नोव्हेंबर 2019 ते ऑगस्ट 2021 दरम्यान झालेल्या अत्याचारासंदर्भाने विमानतळ पोलीसांनी पकडून आणलेल्या एकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एल.गायकवाड यांनी एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नांदेड जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यात राहणाऱ्या एका 27 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्या आहेत.मुंबईला एका कार्यक्रमादरम्यान मुखेड तालुका मनसे अध्यक्ष संतोष बनसोडे यांची भेट झाली. त्यांनी भाचा सिध्दांत अंगदराव बनसोडे यांची भेट करून दिली. सिध्दांत बनसोडे हे अग्नीशमनि दलात मुंबई येथे कार्यरत आहेत. आपल्या ओळखीचा फायदा घेवून सिध्दांत बनसोडेने त्या महिलेवर नोव्हेंबर 2019 ते एप्रिल 2020 आणि पुढे अत्याचार सुरू ठेवला. नांदेड शहरातील विविध जागांचा या तक्रारीत उल्लेख आहे. त्यानंतर त्या महिला गर्भवती झाल्या. तेंव्हा सिध्दांतचा भाऊ आनंदराव सोनकांबळे याने त्यांना गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या. सिध्दांतला लग्नाची विचारणा केली तेंव्हा तो प्रतिसाद देत नाही. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 362/2021 हा 1 डिसेंबर 2021 रोजी दाखल केला. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेचे कलम 376(2), (एन) आणि 34 जोडण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक आर.वाय.बुरकुले यांच्याकडे देण्यात आला. विमानतळ पोलीसांनी 6 जानेवारी रोजी महिलेला गर्भपाताच्या गोळ्या आणून देणारा प्रेमानंद उर्फ प्रेम आनंदराव सोनकांबळे (21) रा.मुखेड यास अटक केली.
आज पोलीस उपनिरिक्षक आर.वाय.बुरकुले, पोलीस अंमलदार रामदास सुर्यवंशी, बंडू पाटील आणि कानगुले यांनी प्रेमानंद उर्फ प्रेम सोनकांबळेला न्यायालयात हजर केले तेंव्हा पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने एक दिवसासाठी मान्य केली आहे.