एस.टी.महामंडळ संपविण्याच खलबत
नांदेड(प्रतिनिधी)-एस.टी.महामंडळ कर्मचाऱ्यांच्या त्रासामुळे अगोदरच डबघाईला आलेला आहे. त्यातच काही कर्मचारी संघटनांनी संप परत घेतल्यामुळे कांही एस.टी.गाड्या सुरू झाल्या आहेत. पण आता सुरू झालेल्या एस.टी. गाड्यांवर कांही ठिकाणी दगडफेक होत आहे. त्यामुळे पुढे एस.टी.महामंडळ अजून दरीत पडेल अशी परिस्थिती तयार करणाऱ्यांविरुध्द अत्यंत कडक कायदेशीर कार्यवाही होणे अपेक्षीत आहे. असे झाले नाही तर एस.टी.वर होणाऱ्या दगडफेकीमागे कोणाचे तरी खलबत आहे. हे निश्चित होईल.
आज सकाळी लातूरहून नांदेडकडे येणाऱ्या एस.टी.बस क्रमांक एम.एच.13 सी.यु.9352 या गाडीवर विष्णुपूरी भागातील पंजाब ढाब्यासमोर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक करून गाडीचे जवळपास 15 हजार रुपयांचे नुकसान केले. या गाडीचे चालक विश्र्वनाथ गिते होते. आणि वाहक राजेंद्र चिद्राम हे होते. याबाबत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात विश्र्वनाथ गिते यांनी तक्रार दिली आहे. महामंडळाचे पर्यवेक्षक सुरेश फुलारी आणि व्ही.पी.इंगळे यांनी या ठिकाणची पाहणी केली. या दगडफेकीत कोणात्याही माणसाला मार लागला नाही हीच सुदैवाची बाब. पण घडलेला प्रकार हा एस.टी.महामंडळाला पुन्हा एकदा खोल दरीत ढकलण्याचा प्रकार दिसतो आहे. यासाठी अशा घटनांची सविस्तर आणि सखोल चौकशी आवश्यक आहे. नाही तर हा घटनाक्रम पुढे वाढत जाईल आणि एस.टी. महामंडळ संपल्याशिवाय राहणार नाही. कोण आहे तो असा प्रकार घडविणारा याचा शोध अत्यंत महत्वपुर्ण आहे.
