हदगाव न्यायालयाने सात वर्षापुर्वी दिलेली शिक्षा नांदेड जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली

नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सन 2015 मध्ये जीवनावश्यक वस्तु कायद्यानुसार दिलेली शिक्षा अपील प्रकरणात कायम ठेवल्याचे आदेश सत्र न्यायाधीश एस.ई. बांगर यांनी दिले आहेत.
हदगाव शहरात 23 जून 2010 रोजी सायंकाळी 5 वाजता पुंजाजी गमाजी पोहने या सहाय्यक पोलीस निरिक्षकांनी सोनुले चौक येथे असलेल्या वैभवी टी पॉईंट या चहाच्या दुकानात तपासणी केली. तेथे घरगुती वापराचे सिलेंडर व्यवसायीक कारणासाठी वापरले जात होते. त्यांच्या तक्रारीनुसार त्या ठिकाणचे सिलेंडर 3325 रुपये किंमतचे जप्त करण्यात आले. आणि चहा दुकानाचे मालक निलेश राजेंद्र गोरटे याच्याविरुध्द जीवनावश्यक वस्तु कायदा कलम 3 आणि 7 नुसार गुन्हा क्रमांक 27/2010  दाखल केला.
या खटल्याची सुनावणी हदगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्हि.एन.ठाकूर यांच्यासमक्ष पुर्ण झाली. त्यावेळी न्यायाधीश ठाकूर यांनी त्यांच्या समक्ष तपासण्यात आलेल्या चार साक्षीदारांच्या पुराव्यावर आधारीत निलेश राजेंद्र गोरटेला तीन महिने कैद आणि 100 रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या शिक्षेविरुध्द गोरटेने जिल्हा न्यायालय नांदेड येथे अपील दाखल केले. या अपील प्रकरणात सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍड. श्रीमती ए.जी. कोकाटे यांनी हदगाव न्यायालयाने दिलेली शिक्षा योग्य आहे असा युक्तीवाद मांडला. आरोपीच्यावतीने ऍड. एन.के.शर्मा यांनी शिक्षा रद्द करावी असा युक्तीवाद मांडला. युक्तीवाद ऐकून न्या.बांगर यांनी सहा वर्षापुर्वी निलेश गोरटेला हदगाव न्यायालयाने दिलेल्या शिक्षेत कोणताही बदल न करता ती शिक्षा कायम ठेवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *