नांदेड -(प्रतिनिधी)-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुगाव बु. ता. नांदेड या शाळेचे उपक्रमशील आदर्श मुख्याध्यापक विठ्ठल ताकबिडे यांच्या मातोश्री कै. सरस्वतीबाई बळीराम ताकबिडे यांच्या सहाव्या पुण्यस्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खर्या अर्थाने प्रत्येक मुलाच्या आयुष्याला योग्य वळण देण्याचे काम हे आईच करत असते. तद्वतच कार्यक्रमाचे आयोजक विठ्ठल ताकबिडे यांच्या आईने त्यांच्यावर केलेल्या संस्काराचा ठेवा हा अनमोल आहे. म्हणूनच आईचे पुण्यस्मरण दरवर्षी विद्यार्थ्यांना वस्त्रदान व शैक्षणिक साहित्याचे वाटप करून करतात. असे उदगार शिक्षक परिषदेचे राज्य कार्यकारी अध्यक्ष मधुकर उन्हाळे यांनी काढले.
सहाव्या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका गटशिक्षणाधिकारी रूस्तुम आडे हे होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये शिवा कर्मचारी महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष संजय कोठाळे, पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष फारूख बेग, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चोंडे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर मांजरमकर, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष डी.एम. पांडागळे, केंद्रप्रमुख बळीराम फाजगे हे होते.
प्रथम मातोश्री कै. सरस्वतीबाई ताकबिडे यांच्या प्रतिमेस अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शाळेतील आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या अनाथ मुली कु. अंजली भवरे, शालिनी राक्षसमारे, प्रीती वैद्य, समीक्षा गायकवाड, छाया राक्षसमारे, दर्पण वैद्य या मुलींना वस्त्रदान ड्रेसचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करून उर्वरीत शाळेतील 150 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कोठाळे यांनी केले, तर बालाजी पांपटवार, बाळासाहेब मटके यांनी शुभेच्छा दिल्या. तर दिगंबर मांजरमकर, बळीराम फाजगे, निळकंठ चोंडे, डी.एम. पांडागळे, फारूख बेग यांची समायोचित भाषणे झाली. अध्यक्षीय समारोप रूस्तुम आडे यांनी केला. सदरील कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन अादर्श शिक्षक शिवाजी कहाळेकर यांनी केले, तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर मरकंटे, राजेश्वर जल्लावार, धोंडिबा हिंगमिरे, गजानन भोसले, गजानन शिंदे, मेघाराणी देशमुख, अरूणा कोटगिरे, स्वाती गिरी, ज्योती हनेगावे, भाग्यश्री चव्हाण आदींनी केले. या कार्यक्रमात गावातील बचतगटाच्या प्रमुख सौ. कमळाबाई वैद्य यांनी अतिशय गोड आवाजात आईवरील ’सुखा येती धावत सारे, दुःखाला ती आई, आई विन माया दुनियेत नाही’, हे गीत गाऊन वातावरणात करूणभाव निर्माण केला. शेवटी कार्यक्रमाचे आयोजक विठ्ठल ताकबिडे यांनी आभार मानले.
