मित्राच्या पत्नी सोबत अनैतिक संबंध होते म्हणे ..
नांदेड,(प्रतिनिधी)- १८ डिसेंबर पासून गायब असलेल्या एका युवकाचे प्रेत तर सापडले नाही. ग्रामीण पोलिसांनी त्या बेपत्ता युवकाचा खून करून त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या कारणावरून चार युवकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा शोध मागील दोन आठवडत्यांपासून सुरु होता अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.मरणारा आणि मारेकरी सर्वच गुन्हेगार क्षेत्रातील नवखी मंडळी असल्याचे सांगण्यात आले.
शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्यात २१ जानेवारी २०२२ रोजी कस्तुरीबाई सुलगेकर यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार त्यांचा नातू सुनील सुरेश सुलगेकर (२१) हा कोणास काही न सांगता एक महिन्यापूर्वी पासून गायब झाला आहे.वजिराबाद पोलिसांनी या बाबत मिसिंग क्रमांक १/२०२२ दाखल केला आहे.त्याचा तपास सुरु आहे.
काल दिनांक २२ जानेवारी २०२२ रोजी व्यंकटेश राजू सुलगेकर रा. बंदाघाट रस्ता नांदेड यांनी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे हजर येऊन जबाब लिहून दिला आहे की,त्यांचा चुलत बंधू सुनील सुरेश सुलगेकर मला मागे १८ डिसेंबर रोजी भेटला होता.सुनीलचे वडील सुरेश सुलगेकरचा सन २०११ मध्ये शिवाजीनगर भागात खून झाला आहे.आईचा मृत्यू आजाराने झाला आहे.सुनील मोठा झाला तसे त्याला दारू,गुटखा,गांजा पिण्याची सवय लागली. त्याचे मित्र अनिरुद्ध आंचेवार,सोनू,अभिजित पुजारी,गोविंद नायके,अनिल पवार हे आहेत. या चार पैकी एका मित्राच्या पत्नी सोबत सुनीलचे अनैतिक संबंध होते.तसेच दुसऱ्या मित्राच्या मैत्रिणी सोबत त्याचे बोलणे होते.त्यातून वाद झाला आणि चार जणांनी मिळून सुनील सुलगेकरचा खून १८ डिसेंबर रोजी कौठा परिसरात डोक्यात दगड घालून खून केला आहे.तसेच त्याला जाळून त्याची हाडे गोदावरी नदीत टाकून दिली आहे.असे गोविंद नायके याने सांगितले आहे.
या तक्रारीवरून सुनील सुलगेकरचे प्रेत सापडले नाही तरी नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री अशोकरावजी घोरबांड यांच्या आदेशानुसार गुन्हा क्रमांक ३९/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२,२०१,३४ चार जणांची नावे आरोपी सदरात लिहून दाखल केला आहे. या बाबत मागील १५ दिवसांपासून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात काहीतरी प्रक्रिया सुरु होती असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे.गुन्ह्याचे घटनास्थळ पण अद्याप निश्चित नाही.या गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक विजय पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.