नांदेड(प्रतिनिधी)-मौजे बाळापूर ता.धर्माबाद येथील मे.पायोनिअर डिस्ट्रलरी येथून उत्पादन शुल्क भरून निघालेले 1100 बॉक्स मद्य बनावट अपघात दाखवून अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवला. अशा 20 लाख 55 हजार 940 रुपयांचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क देगलूर विभागाने पकडला आहे. या प्रकरणी 3 जण तीन दिवसाच्या एक्साईज कोठडीत आहेत.
काल दि.22 जानेवारी रोजी देगलूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मौजे एकलारा ता.मुखेड आणि मौजे तमलुर ता.देगलूर या दोन ठिकाणी छापे टाकले. त्या ठिकाणी मॅगडॉल नंबर वन नावाच्या मद्याचे असंख्य बॉक्स सापडले. या प्रकरणी दारु बंदी विभागाने बालाजी अनिल हिमगिरे (24), दिपक अनिल हिमगिरे (21) दोघे रा.एकलारा ता.मुखेड तसेच ईरशाद मोहम्मद शेख (21) रा.तमलुर ता.देगलूर अशा तिन जणांना पकडले. त्यांना तीन दिवस एक्साईज कोठडी प्राप्त झाली आहे.
मे.पायोनिअर डिस्ट्रलरी येथून 1100 बॉक्स घेवून निघालेल्या मद्य साठ्याची अवैध विक्री करण्यासाठी तो मद्य साठा उतरविण्यात आला आणि तुळजापूरजवळ जवळ मद्य घेवून जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला असा बनावटपणा करण्यात आला. त्यातील 415 मद्याचे बॉक्स तुळजापूर पोलीसांनी आणि 30 बॉक्स मद्य हट्टा पोलीसांनी जप्त केले. उर्वरीत मद्य साठ्यापैकी 262 बॉक्सचा मद्यसाठा तमलूर आणि मुखेड येथे जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक उषा वर्मा, उपायुक्त प्रदीप पवार आणि अधिक्षक नांदेड अतुल कानडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत व मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली. देगलूर विभागाच्या पथकाचे निरिक्षक ए.एम.पठाण, त्यांचे सहकारी रामलिंग सूर्यवंशी, शिवाजी कोरनुळे, उज्वल सदावर्ते, फाजिल खतीब, राजकिरण सोनवणे, हरि पाकलवाड, ए.जी.शिंदे, मोहम्मद रफी, बालाजी पवार, विकास नागमवाड, परमेश्र्वर नांदुसेकर, आर.बी. फाळके, शिवदास नंदगावे, दिलीप जाधव यांनी कार्यवाही पार पाडली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, अवैध मद्यविक्री, निर्मिती, वाहतुक या संदर्भात कांही तक्रार असल्यास जनतेने टोल फ्री क्रमांक 18008333333, व्हॉटसऍप क्रमांक 8422001133 आणि दुरध्वनी क्रमांक 02462-287616 यावर माहिती द्यावी.