..यशस्वी पोलीस निरिक्षक अशोकरावजी घोरबांड यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारा अर्ज दिला सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकाने

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या एका वर्षाची यशोगाथा स्वत: प्रसिध्दीसाठी देणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब यांनी माझ्या जीवनाची वाट लावली म्हणून त्यांच्यासह कांही इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी असा अर्ज परभणी जिल्ह्यात पोलीस ठाणे पिंपळदरी येथे कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर राघोजी काकडे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस उपमहानिरिक्षक नांदेड परिक्षेत्र आणि पोलीस अधिक्षक परभणी यांना सादर केला आहे.
सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर राघोजी काकडे यांनी लिहिलेल्या एका अर्जाप्रमाणे ते पोलीस ठाणे जिंतूर येथे 29 मे 2015 ते 18 जुलै 2020 पर्यंत कार्यरत होते. त्यांची नियुक्ती दूरक्षेत्र आडगाव ता.जिंतूर येथे होती. ही नियुक्ती 12 नोव्हेंबर 2018 पासून सुरू झाली. त्यावेळी जिंतूूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सन्माननिय अशोकरावजी घोरबांड साहेब होते. त्यांनी आणि त्यांच्यासह सहाय्यक पोलीस निरिक्षक अभय दंडगव्हाण, एस.आय.स्वामी, पोलीस अंमलदार नंदकुमार नामदेव सिसोदीया बकल नंबर 644, श्रीराम माणिकराव दंडवते बकल नंबर 652, राजेश्र्वर विठ्ठलराव सरोदे बकल नंबर 799 आणि राजकुमार ग्यानोजी पुंडगे बकल नंबर 547 या सर्वांनी जिंतूर शहरात मटका चालवणारा सुरेश सत्यनारायण जैयस्वाल याच्या नावाचे सर्व गुन्हे हे दुरक्षेत्र आडगाव या कार्यक्षेत्रात घडले असा बनावट व खोटा पुरावा तयार करून माझ्याविरुध्द कसुरी अहवाल पाठवल्याचे भाग्य श्री अशोकरावजी घोरबांड साहेबांनी प्राप्त केले. या कसुरी अहवालावरून माझी कोणतीही चौकशी न करता, मला कोणतीही संधी न देता तत्कालीन पोलीस अधिक्षक परभणी कृष्णकांत उपाध्याय यांनी भारतीय राज्य घटनेतील कलम 311 चा वापर करून मला पोलीस सेवेतून बडतर्फ केले.
मला कोणतीही संधी मिळाली नाही म्हणून मी पोलीस उपमहानिरिक्षक, महाराष्ट्राचे गृहमंत्री यांंच्याकडे माझ्या बडतर्फी विरुध्द अपील सादर केले आणि त्यानंतर माझी पुन्हा पोलीस सेवेत नियुक्ती झाली. मटका चालविणाऱ्या सुरेश सत्यनारायण जैयस्वाल याच्या बद्दलचे काही कोर्टाने त्यास निर्दोष सोडलेले गुन्हे, कांही गुन्ह्यांमध्ये तो आरोपी नसतांना तो आरोपी आहे असे दाखवले. सोबतच सुरेश जैयस्वालने केलेल्या सर्व गुन्ह्यांचे कार्यक्षेत्र जिंतूर शहर असतांना त्याचे सर्व गुन्हे मी कार्यरत असलेल्या दुरक्षेत्र आडगावच्या हद्दीत दाखवले आणि माझ्याविरुध्द कसुरी अहवाल पाठवतांना असंख्य बनावट कागदपत्रे तयार केली.
सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर राघोजी काकडे यांच्या सांगण्याप्रमाणे माझ्याविरुध्द कसुरी अहवाल पाठवणारे आणि त्यात सहभागी असणारे कांही माझे वरिष्ठ अधिकारी आहेत. कांही माझे सहकारी आहेत म्हणून त्यांच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 166, 167, 177, 182, 191, 464, 464(अ), 465, 471, 181(ब), 192, 193, 196, 499, 500 आणि 34 नुसार मला या अधिकारी व सहकारी पोलीस अंमलदारांविरुध्द गुन्हा दाखल करण्यांची परवानगी द्यावी अशी विनंती या अर्जात केलेली आहे.
अशा या बहाद्दर पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब यांनी कालच आपले नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील तात्पुरत्या पदभाराचे एक वर्ष पुर्ण झाल्याची यशोगाथा प्रसारमाध्यमांना सांगितली. त्यांनी 31 जानेवारी रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचा तात्पुरता पदभार घेतला होता. आजही तो पदभार तात्पुरताच आहे. त्याला 365 दिवस झाले आहेत हे मात्र नक्की. या कालखंडात केलेल्या कामाबद्दल लिहितांना आपल्या यशोगाथेत भरपूर कांही लिहिले आहे. पण त्यासोबत परमेश्र्वर राघोजी काकडे यांची पण मी वाट लावली होती हे या यशोगाथेत लिहिलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *