नांदेड,(प्रतिनिधी)-कोविड-19 ओमायक्रॉन विषाणूचे झपाट्याने संक्रमण होत आहे. राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी 31 जानेवारी 2022 रोजीच्या शासन आदेशान्वये जिल्ह्यात नवीन नियमावली 1 फेब्रुवारी 2022 रोजीच्या मध्यरात्रीपासून ते पुढील आदेशापर्यंत लागू केली आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांनी आज आदेश निर्गमीत केले आहेत.
राज्यात 13 मार्च 2020 पासून साथरोग अधिनियम 1897 ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या अधिनियमाअंतर्गत कोरोना विषाणू (कोविड-19) या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रतिबंध करण्यासाठी वेळोवळी विविध आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. सद्यस्थितीत या आदेशाच्या तरतूदी जिल्ह्यात लागू आहेत. शासन व जिल्हा प्रशासनाचे आदेशातील सर्व निर्देश, सूचना, अटी व शर्तीचे पालन करणे सर्व संबंधितांना बंधनकारक असेल. कोविड-19 साथरोगसंदर्भाने शासनाचे आदेश, जिल्हा प्रशासनाचे आदेशांमधील अटी, शर्ती, दंडाबाबत निर्देशांचे काटेकोर पालन करणे संबंधित व्यक्ती, आस्थापना व शासकीय-निमशासकीय विभागांना बंधनकारक आहे. पुढील नविन नियमावलीचे पालन करणे सक्तीचे असेल.
आदेशासोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये नमूद केलेल्या यादीतील जिल्ह्यांमध्ये 30जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेल्या 90 टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस व त्याचप्रमाणे 70 टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले असतील. अशा जिल्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. ही यादी सार्वजनिक आरोग्य विभागास मिळालेल्या अधिकृत माहितीच्या आधारे शासनामार्फत प्रत्येक आठवड्यात अद्ययावत केली जाईल. त्याचप्रमाणे जोडपत्रामध्ये समाविष्ट केल्या जाणाऱ्या जिल्ह्याचा कोविड प्रसार संदर्भात पूर्ण आढावा घेतल्यानंतर निर्णय घेतला जाईल. ज्यामध्ये सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्याचा समावेश झालेला नसुन लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यावर भर दिल्यास जिल्ह्याचा समावेश परिशिष्ट-अ मध्ये लवकर होईल.
जिल्ह्यात पुढील सवलती लागू राहतील
सर्व उद्याने हे नियमित वेळेत सुरु राहतील, परंतु इथे भेटी देणाऱ्या सर्व लोकांचे पूर्णपणे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. नियंत्रण करणाऱ्या प्रशासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर अशा ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या लोकांच्या संख्येवर वाजवी निर्बंध लावावे. कोणत्या वेळेला किती लोक याठिकाणी असतील याचा निर्णय स्थानिक प्रशासनाला आपल्या पातळीवर घ्यावा लागेल.
राज्यभरात/नांदेड जिल्ह्यात ऑनलाइन तिकिट लागू असलेले सर्व पर्यटन स्थळे नियमित वेळेत सुरु राहतील. अशा स्थळांना भेटी देणाऱ्या अभ्यागतांनीही पूर्णपणे लसीकरण केलेले असावे. सनियंत्रण करणाऱ्या प्रशासनाला अशा ठिकाणी एका वेळेला किती लोकांना प्रवेश द्यायचा हे वाजवी कारणांसहित ठरवता येईल. ब्युटी सलून तसेच केशकर्तनालय यांना लागू असलेल्या सर्व निर्बंधांसह जिल्ह्यातील स्पा हे क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत सुरु ठेवता येईल. अंत्यसंस्कारांसाठी उपस्थित राहणाऱ्या लोकांच्या संख्येवर कोणतेही निर्बंध नसतील.
परिशिष्ट-अ मध्ये नमूद न केलेल्या जिल्ह्यांसाठी, शासन आदेशामधील सवलती पूर्णपणे किंवा अंशतः, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या स्पष्ट परवानगीनंतरच लागू होतील. अशा शिथिलता मिळविण्याच्या प्रस्तावांमध्ये जिल्ह्यातील लसीकरणाची स्थिती, लसीकरण वाढविण्याची योजना/नियोजन, तसेच मोठ्या संख्येने लोकांनी लस न घेतानाही सवलती का द्यावे याबद्दल उल्लेख करावा लागेल. अशा अंशतः परवानगीसाठी विधीवत प्रस्ताव ग्रामीण भागात गटविकास अधिकारी तसेच नागरी भागात संबंधीत आयुक्त, महानगरपालिका, नगरपालिका / नगर पंचायत मुख्याधिकारी यांनी (Incident Commander) उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्यामार्फत सादर करावा. तत्पश्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत वेगळ्याने आदेश निर्गमित करण्यात येतील. वरील सर्व गोष्टी 8 जानेवारी 2022 रोजीच्या आदेशाच्या कोविड योग्य वर्तनाचे काटेकोर पालन करण्याच्या अधीन असतील. विशेषत: नमूद केल्या व्यतिरिक्त इतर सर्व निर्बंध 8 आणि 9 जानेवारी 2022 च्या जिल्ह्यात निर्गमित केलेल्या 11 जानेवारी 2022 च्या आदेशांमध्ये नमूद केले जातील.
या आदेशाचे पालन न करणारे नागरीक भारतीय दंड संहिता 1860 मधील व संदर्भ 1 व 2 मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहतील. आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गटविकास अधिकारी तसेच नागरी भागात संबंधीत आयुक्त, महानगरपालिका, नगरपालिका/नगर पंचायत मुख्याधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधीत कार्यालय प्रमुख यांची राहिल. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांची राहिल, असेही आदेशात नमूद केले आहे.