आपल्याच कार्यालयातील महिलेचा धनादेश देण्यासाठी घेतले पैसे
नांदेड(प्रतिनिधी)-आपल्याच कार्यालयातील एका महिलेच्या रजारोखीकरणाची मंजूरीचा धनादेश तिला देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागणी करून ती स्विकारणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे.
दि.3 फेबु्रवारी रोजी एका तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, त्यांच्या आईचे रजारोखीकरण मंजुर झालेल्या अर्थसंकल्पातील धनादेश पंचायत समिती लोहा येथून काढून तो तक्रारदाराच्या आईच्या खात्यावर जमा करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पेणूर ता.लोहा येथील कनिष्ठ सहाय्यक सिध्दार्थ मारोती सोनकांबळे यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली आहे. याबाबत 3 फेबु्रवारी रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी झाली. ही पडताळणी झाली तेंव्हा सिध्दार्थ सोनकांबळेने पैसे मागल्याची बाब निष्पन्न झाली. त्यानंतर आज 8 फेबु्रवारी रोजी राज हॉटेल, लोहा येथे सिध्दार्थ सोनकांबळे यांनी 5 हजार रुपयांची लाच स्वत: स्विकारली. लाच स्विकारताच एसीबी अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी सिध्दार्थ सोनकांबळेला ताब्यात घेतले. पोलीस ठाणे लोहा येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार सिध्दार्थ मारोती सोनकांबळे (34) व्यवसाय कनिष्ठ सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्रे पेनूर ता.लोहा आणि रा.सिध्दार्थनगर कंधार याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस उपनिरिक्षक शेषराव नितनवरे हे तपास करणार आहेत. ही सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ.राहुल खाडे, अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक शेषराव नितनवरे, पोलीस अंमलदार किशन चिंतोरे, हनमंत बोरकर, सचिन गायकवाड, ईश्र्वर जाधव आणि गजानन राऊत यांनी पूर्ण केली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही माहिती देतांना जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तसेच त्याच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवर बोलणे असेल,ऑडीओ, व्हिडीओ असेल, एसएमएस असतील तसेच भ्रष्टाचार संबंधाने कांही माहिती असेल तसेच माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती प्राप्त झाली असेल तर याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी टोल फ्रि क्रमांक 1064(2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02426-253512, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांचा मोबाईल क्रमांक 7350197197 यावर सुध्दा माहिती देता येईल तसेच एसीबी विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर, मोबाईल ऍपवर आणि फेसबुक पेजवर सुध्दा याची माहिती देता येईल जनतेने भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही माहिती द्यावी असे आवाहन एसीबी विभागाने केले आहे.
पेनूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यक अडकला 5 हजारांच्या लाच जाळ्यात