नांदेड(प्रतिनिधी)- लहानमध्ये घडलेल्या रान पेटविण्याच्या प्रयत्नांना पोलीसांनी वेळीच आवर घातला असे वृत्तांकन आम्ही काल केले होते. पण या घटनेत पोलीसांनी 28 जणांविरुध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करून पुन्हा एकदा अनुसूचित जातीच्या समाजावर अन्यायच केल्याची खळबळजनक माहिती आंबेडकरी नेते सुरेशदादा गायकवाड यांनी दिली आहे.
वास्तव न्युज लाईव्हने काल दि.8 फेबु्रवारी रोजी लहानमध्ये रान पेटविण्याच्या वाईट उद्देशातून घडलेल्या घटनेचे प्रतिसाद मोठे होणार नाहीत यासाठी पोलीसांनी केलेले प्रयत्न अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे लिखाण केले होते. त्यानंतर मात्र या घटनेची वेगवेगळी परिस्थिती सुरेशदादा गायकवाड यांनी वास्तव न्युज लाईव्हला सांगितली त्यानुसार अनुसूचित जातीच्या वसाहतीत घुसून महिलांना अर्वाच्च शिवीगाळ, सामानाची नासधुस करणाऱ्या मंडळीतील लोकांनी दहशत तर तयार केलीच. या प्रसंगाचे व्हिडीओ चित्रीकरण अनुसूचित जातीच्या मंडळीकडे आहेत. जर ही मंडळी तेथे आपले स्वत:चे संरक्षण करण्याची मरमर करत असतांना ते लुट करायला कसे जातील असा सवाल सुरेशदादा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
याप्रकरणी अनुक्रमे गुन्हा क्रमांक 35 आणि 36 दाखल आहेत. गुन्हा क्रमांक 35 हा 7 फेबु्रवारीच्या सकाळी 18.30 वाजता मौजे लहान बौध्द वस्तीत घडला असे लिहिले आहे. 18.30 हा वेळ लिहिलेला आहे तर त्यावेळी सकाळ नाही तर संध्याकाळ असते असे गायकवाड म्हणाले. तसेच हा गुन्हा क्रमांक 35 हा 8 फेबु्रवारीच्या 03.25 वाजता स्टेशन डायरी नोंद क्रमांक 2 वर दाखल करण्यात आला आहे. याची उलट बाजू सांगतांना सुरेश गायकवाड म्हणाले गुन्हा क्रमांक 36 जो अनुसूचित जातीच्या लोकांनी दरोडा टाकल्याच्या सदरात दाखल आहे. त्याची वेळ 7 फेबु्रवारीच्या सायंकाळी 18.30 अशी लिहिली आहे. मग एका जागी पोलीस 18.30 ला सकाळ लिहितात तर दुसऱ्या जागी संध्याकाळ लिहितात. या छोट्याशा लिखाणावरून पोलीसांची भावना लक्षात येते. इतर बाबी सांगायला भरपूर आहेत. प्रश्न हा आहे की, अनुसूचित जातीच्या वस्तीमध्ये गोंधळ सुरू असतांना ती मंडळी लुट करण्यासाठी लहान बसस्थानकाकडून आंबेगावकडे जाणाऱ्या पुलाजवळ जावून लुट कशी करतील. या प्रश्नांचे उत्तर पोलीसांना नक्कीच द्यावे लागेल असे सुरेशदादा गायकवाड म्हणाले.
गुरूप्रसाद शिवसांब धारकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनुसूचित जातीच्या आकाश लोणे, अभिजित उर्फ गोट्या वाहवळ, सचिन ढगे, राजू वाहवळ, आदर्श वाहवळ, सत्यम लोणे, प्रितम लोणे, मुकेश दिलीप, प्रिन्स हिरा, सुबोध सावंत, राजू धोंडीबा, किरण लोणे, अभिजित उर्फ अभ्या वाहवळ, राहुल लोखंडे, संतोष गोले, विशाल नितनवरे, विजय सावंत, जितेंद्र लोणे, राहुल तुकाराम लोणे, राजू लोणे, गौतम लोणे, सचिन सावंत, अर्जुन सावंत, बुध्दरत्न लोणे, बाळासाहेब लोणे, सुरेश ढगे, कपिल बाबूराव लोणे आणि दलित वाहवळ अशी 28 जणांची नावे आहेत ज्यांनी गुरूप्रसाद धारकर मोटारसायकल क्रमांक एम.एच.26 वाय.5844 वर बसून आपला मित्र अविनाश लोखंडेसह बारडकडे जात असतांना हातात लाठ्या-काठ्या-लोखंडी रॉड यांच्या सहाय्याने पायावर, नाकावर, मारून दोघांना खाली पाडून खिशातील 47 हजार रुपये, पाच ग्रॅम सोन्याची अंगठी 20 हजार रुपयांची आणि अविनाश लोखंडे यांच्या खिशातील 3 हजार रुपये बळजबरीने काढून घेतले आहेत. अर्धापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल करून त्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक एम.एन.दळवे यांच्याकडे दिला आहे.
या बद्दल पुढे बोलतांना सुरेशदादा गायकवाड म्हणाले अनुसूचित जातीची वस्ती आणि लुट झालेला लहान पुल यातील अंतर तपासले तर दोन्ही जागांमध्ये एकाच वेळी 18.30 वाजता दोन घटना कशा घडल्या. ऍट्रॉसिटी कायदा आपल्याला लागला त्याचा प्रतिकार म्हणून पोलीसांनी गुन्हा क्रमांक 36 ची तक्रार घेतली आणि अनुसूचित जातीच्या मंडळीविरुध्द गुन्हा दाखल केला. यामुळे हा वाद पोलीसांनी रान पेटविण्यासारखाच केला आहे. पोलीसांकडे तक्रार येते तेंव्हा त्याची शहानिशा होते आणि मगच गुन्हा दाखल होतो. या प्रकरणातील गुरूप्रसाद धारकर आणि अविनाश लोखंडे यांच्याकडून लुटलेले साहित्य त्यांच्या होते काय? त्यांच्याकडे कुठून आले याचा शोध पोलीसांनी न घेताच हा गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखवली आहे असा आरोप सुरेशदादा गायकवाड यांनी केला. गुन्हा क्रमांक 36 ची तक्रार कोणाच्या तरी दबावातुन दाखल झाली असेल तर उद्या या प्रकरणाचे पोस्टमॉर्टम होईल तेंव्हा दाखल करा असे म्हणणारा पोलीसांच्या पाठीवर हात ठेवणार नाही त्यावेळी कसे होईल असा प्रश्न सुरेशदादा गायकवाड यांनी उपस्थित केला.
आज दि.9 फेबु्रवारी रोजी लहान गावातील सर्व मंडळी पोलीसांनी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याच्या संदर्भाने पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांना भेटायला जाणार आहेत अशी माहिती लहान येथील पत्रकार सुभाष लोणे यांनी दिली. सुभाष लोणे सांगतात की, गुन्हा क्रमांक 36 मध्ये 16 ते 17 वर्षाची अल्पवयीन बालकांची नावे आहेत तसेच 28 आरोपींमधील 7 ते 8 लोक लहान या गावातच राहत नाहीत. ते आपल्या कारभारासाठी इतर गावाला राहतात त्यांचीही नावे या गुन्ह्यात खोटीच गोवली गेली आहेत.आरोपींमध्ये नाव असलेले अनेक मंडळी 18.30 वाजता आपल्या शेतात होती. त्यांची सुध्दा नावे आहेत. लहानच्या अनुसूचित जातीच्या मंडळीकडे अनुसूचित जातीच्या वस्तीत घातलेल्या गोंधळाची व्हिडीओ फित आहेत. झालेल्या अन्यायाविरुध्द आम्ही लढा देणार आहोत असे सुभाष लोणे यांनी सांगितले.
पोलीसांनी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यामुळे लहानमध्ये रान पेटले -सुरेशदादा गायकवाड