मुगटच्या जिल्हा परिषद शाळेत घडला होता प्रकार
नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जिल्हा परिषद शाळा मुगट येथे सांस्कृतीक कार्यक्रम पाहण्यासाठी गेलेल्या अनुसूचित जातीच्या लोकांना त्या ठिकाणी खुर्चीवर का बसलात या रागातून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या 14 जणांना नांदेड येथील सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी तीन वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकाला 17 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. हा प्रकार सन 2018 मध्ये घडलेला आहे.
उत्तम अशोकराव हटकर (25) ऍटो चालक रा.मुगट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 जानेवारी 2018 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुगटच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या शाळेत असंख्य वेगवेगळ्या जाती धर्माची विद्यार्थी मंडळी शिक्षण घेतात. त्यात अनुसूचित जातीची विद्यार्थी मंडळी सुध्दा आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आणि त्यात असलेले सांस्कृतीक कार्यक्रम पाहण्यासाठी अनुसूचित जातीच्या मुला-मुलींनी आपल्या आई-वडीलांना व इतर नातलगांचा सुध्दा शाळेत बोलावले होते. प्रेक्षकांसाठी त्या ठिकाणी कांही खुर्च्या आणि सतरंज्या अंथरलेल्या होत्या. त्यातील खुर्च्यांवर अनुसूचित जातीतील मंडळी बसल्यानंतर तुम्ही या जागेवर कसे बसलात असे सांगत त्यांना तेथून उठण्यास सांगण्यात आले. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम, जिल्हा परिषदेच्या शाळेतील कार्यक्रम हा सार्वजनिक कार्यक्रम आहे. या विचाराने तेथे वाद झाला. त्यानंतर अनुसूचित जातीची मंडळी गावातील बौध्द विहाराजवळ जावून थांबली असतांना जमावाने त्यांच्यावर दगडफेक सुध्दा केली. उत्तम अशोकराव हटकर यांनी दिलेल्या या तक्रारीत राजेश नंदाजी कल्याणे(22), अमोल बालाजी जाधव (24), दत्ता भगवान कल्याणे (27), गजानन विजयराव कल्याणे (35), अनिल शंकरराव कल्याणे(22), फुलाजी अशोकराव मुंगल(25), रोहित रामराव कल्याणे (21), सतिश रमेश उर्फ बाबूराव कल्याणे (30), राहुल व्यंकटराव कल्याणे (30), ओमकार रामराव कल्याणे (18), उध्दव मुर्ताजी मुंगल (23), बालाजी साहेबराव मुंगल(18), निर्गुण बालाजीराव मुंगल(22), बालाजी आनंदराव कल्याणे (30) अशी 14 जणांची नावे आहेत.
या प्रकरणात मुदखेड पोलीसांनी गुन्हा क्रमांक 14/2018 भारतीय दंड संहितेच्या कलम 324, 143, 147, 149 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1)(आर), (एस) नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास अर्धापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब देशमुख आणि अर्चना पाटील यांनी केला होता. न्यायालयात या ऍट्रॉसिटी सत्र खटल्याचा क्रमांक 14/2018 असा होता. न्यायालयात या खटल्यात 10 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालय समक्ष नोंदवले. उपलब्ध पुराव्या आधारावर न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी 14 जणांना ऍट्रॉसिटी कायद्यातील कलमांनुसार आणि इतर कलमांनुसार वेगवेगळ्या शिक्षा दिल्या.सर्व शिक्षा आरोपीना एकत्र भोगायच्या आहेत.त्यानुसार 14 आरोपीना 3 वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकास 17 हजारांचा रोख दंड असा एकूण 2 लाख 38 हजार रुपये दंड ठोठावला आहे. या खटल्यात सरकारी वकील ऍड.रणजित देशमुख यांनी बाजू मांडळी.मुदखेडचे पोलीस हवालदार अजय साकळे यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका वठवली.
