46 हजारांच्या बीडी, सिगरेटची चोरी; 1 लाखांची म्हैस चोरली

नांदेड(प्रतिनिधी)-भोकर येथे एक दुकान फोडून चोरट्यांनी सिगरेट, बिडी असे 46 हजारांचे साहित्य चोरले आहे. श्रीरामनगर नांदेड आणि इतवारा भागातून दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. त्यांची किंमत 65 हजार रुपये आहे. बहाद्दरपुरा येथून 1 लाख 5 हजार रुपये किंमतीची एक म्हैस चोरीला गेली आहे. इतवारा आठवडी बाजारातून रविवारी 10 हजारांचा मोबाईल चोरीला गेला आहे. पांढरवाडी ता.मुदखेड येथून मोबाईल टॉवरच्या 73 हजार रुपये किंमतीच्या बॉटल्या चोरीला गेल्या आहेत. उस्माननगर जवळील वाका शिवारातून 8 हजार रुपयांचे दोन क्विंटल हरभरा पिक चोरीला गेले आहे. यशवंतनगर भागातून दहा हजार रुपये किंमतीची सायकल चोरीला गेली आहे.
भोकर शहरातील बालाजी मंदिराजवळ असलेले दातार ट्रेडर्स नावाचे दुकान 12-13 फेबु्रवारीच्या रात्री चोरट्यांनी फोडून त्यातून सिगरेट, बीडीचे दहा बॉक्स 46 हजार रुपये किंमतीची चोरट्यांनी चोरून नेले आहेत. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कराड हे करीत आहेत.
श्रीरामनगर भागातून तानाजी शिवाजी पांचाळ यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एफ.0421 ही 35 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी 9-10 फेबु्रवारीच्या रात्री चोरीला गेली. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
इतवारा दवाखान्याच्या पाठीमागे अब्दुल बाशीद मोहम्मद अब्दुल यांनी उभी केलेली 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.ई.7773 ही 10 फेबु्रवारी रोजी रात्री 9 ते 10 वाजेदरम्यान चोरीला गेली. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे. पोलीस अंमलदार विक्रम वाकडे अधिक तपास करीत आहेत.
बहाद्दरपुरा ता.कंधार येथील मोहम्मद जफर अहेमद मोहम्मद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 फेबु्रवारीच्या मध्यरात्री 12.30 ते 3 वाजेदरम्यान मासपुरी-बहाद्दरपुरा रस्त्यावरील त्यांच्या शेतातून 1 लाख 5 हजार रुपये किंमतीची म्हैस कोणी तरी चोरून नेली आहे. कंधार पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गणाचार्य अधिक तपास करीत आहेत.
मोहम्मद आरेफ खान मोहम्मद दुल्हेखान हे 13 फेबु्रवारी रोजी 11.30 वाजेच्यासुमारास रविवारच्या आठवडी बाजारात खरेदी करत असतांना त्यांच्या खिशात ठेवलेला 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी चोरून नेला आहे. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार मानेकरी अधिक तपास करीत आहेत.
सतिश कामाजी पिंपळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 फेबु्रवारीच्या पुर्वी पांढरवाडी ता.मुदखेड शिवारात मोबाईल टॉवरवरील 73 हजार रुपये किंमतीची बॅटरी कोणी तरी चोरून नेली आहे. बारड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार गुट्टे हे करीत आहेत.
संजय गोपीनाथ हंबर्डे यांच्या वाका येथील शेतातून 3 संशयीत आरोपीतांनी कापून ठेवलेले दोन क्विंटल हरभरा पिक चोरूननेले आहे. हा प्रकार 12 फेबु्रवारीच्या सायंकाळी 6 ते 13 फेबु्रवारीच्या सकाळी 8 वाजेदरम्यान घडला आहे. उस्माननगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कानगुले अधिक तपास करीत आहेत.
सचिन प्रकाश उत्तरवार यांची 10 हजार रुपये किंमतीची सायकल 21 जानेवारीच्या रात्री 2 ते पहाटे 7 वाजेदरम्यान त्यांच्या घरासमोरून यशवंतनगर येथून चोरीला गेली आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार तोटलवार हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *