मिरवणूका, बाईक रॅली काढता येणार नाही
नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतांना शिवजयंती उत्सवाकरीता 500 आणि शिवज्योत वाहण्याकरीता 200 भाविकांना परवानगी दिली आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या जयंतीचे सर्वच कार्यक्रम कोविड नियमावलीत राहुन साजरे करायचे आहेत. या आदेशावर राज्याच्या गृहविभागाचे उपसचिव संजय दगडू खेडेकर यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
दि.14 फेबु्रवारी रोजी गृहविभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार 19 फेबु्रवारी महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज जयंती शासनाच्या निश्चित केलेल्या तारखेनुसारच होते. कोरोना विषाणू आणि ओमिक्रॉन प्रजातीचे संक्रमण अद्याप सुरू आहे. या पार्श्र्वभूमीवर राज्यातील नागरीकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येवून गर्दी करून उत्सव साजरा न करता स्वत:च्या आरोग्याच्या दृष्टीकोणातून काळजी घेवूनच छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासनाने कांही मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत.
कोविड-19 च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करायचे आहे. 19 फेबु्रवारी 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतांना शिवज्योत वाहण्याकरीता 200 भाविकांना आणि शिवजयंती उत्सवाकरीता 500 भाविकांना परवानगी देण्यात आली आहे. अनेक शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी, इतर गढ आणि किल्ले यावर जाऊन तारखेनुसार 18 फेबु्रवारीच्या रात्री 12 वाजता एकत्र येवून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतात. परंतू यावर्षी कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकत्र न येता छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करणे अपेक्षीत आहे.
दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतांना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतू यावर्षी सांस्कृतीक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येवू नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमांचे केबल नेटवर्क किंवा ऑनलाईन प्रेक्षपण उपलब्ध करून देण्याची सोय करावी. प्रभातफेरी, बाईक रॅली अथवा मिरवणूका काढण्यात येवू नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी सोशल डिस्टंसींगचे पालन करावे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी आरोग्य विषयक शिबिरे, रक्तदान करण्यास प्राधान्य द्यावे. त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी. प्रत्येक कार्यक्रमस्थळी मास्क आणि सॅनेटायझर्सचा उपयोग होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. शासनाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भाने काढलेले हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांक 202202141745455829 नुसार प्रसिध्द केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाकरीता 500 भाविकांना परवानगी