नांदेड(प्रतिनिधी)-मुक्रामाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका अल्पवयीन बालिकेला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला मुखेडचे जिल्हा न्यायाधीश एन.टी.त्रीभुवन यांनी 20 वर्ष सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. मुखेड न्यायालयाने घटना घडलेल्या दिवसापासून 382 व्या दिवशी या प्रकरणातील आरोपीला शिक्षा ठोठावली आहे.
दि.1 फेब्रुवारी 2021 रोजी मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीने तक्रार दिली की, त्यांच्या अल्पवयीन बालिकेला पळवून नेण्यात आले आहे. मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 363 प्रमाणे गुन्हा क्रमांक 18/2021 दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास मुक्रामाबादचे सहाय्यक पोलीस निरिक्षक कमलाकर गड्डीमे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गोपीनाथ वाघमारे यांनी सुरू केला. नांदेड जिल्हा सायबर सेल येथून तांत्रिक मदत आणि पोलीस उपनिरिक्षक झाल्यावर आपल्यामध्ये तयार झालेली सर्व कसबे वापरून गोपीनाथ वाघमारे यांनी निजामाबाद (तेलंगणा) येथून ही अल्पवयीन बालिका शोधली आणि तिला पळवून नेणारा अजय मारोती वाघमारे याला गजाआड केले. मुलगी सापडल्यानंतर या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेचे कलम 366 (अ) आणि पोक्सो कायदा कलम 4 आणि 6 ची वाढ झाली. ही सर्व वाढ मुलीच्या जबाबावरुन झाली. त्यानंतर गोपीनाथ वाघमारे यांनी भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्याची कलमे न्यायालयात पुर्णपणे सिध्द करता येतील असे तंत्रशुध्द पुरावे तयार करून पुराव्यांची एक साखळी बनवली आणि अत्यंत कमी वेळेत अजय मारोती वाघमारे विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर वेगवेगळ्या सात साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयात मांडले. यात उपलब्ध झालेल्या पुराव्यांच्या आधारावर न्यायाधीश त्रिभुवन यांनी अल्पवयीन बालिकेला पळवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या अजय मारोती वाघमारेला एकूण 20 वर्ष सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात सरकारी वकील ऍड. सोमनाथ वरपे यांनी काम केले. सहाय्यक पोलीस निरिक्षक संग्राम जाधव यांचीही या तपासात मदत होती. न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार हनुमंत कोंकटवार यांनी काम पाहिले. घटना झालेल्या दिवसापासून 382 व्या दिवशी मुखेड जिल्हा न्यायाधीश एन.पी.त्रिभुवन यांनी अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला शिक्षा ठोठावली आहे. पोलीस दलातील गुन्हा दाखल होणे, त्याचा तपास करणे, प्रकरणातील आरोपीला शिक्षेपर्यंत पोहचविणे ही सर्व कार्यवाही करणाऱ्या गोपीनाथ वाघमारे यांचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, देगलूरचे पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांनी कौतुक केले आहे.