नांदेड(प्रतिनिधी)-किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेचा सतत पाठलाग करून तिला उचलून नेणाऱ्या 24 वर्षीय युवकाला अतिरिक्त सह आणि सत्र न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी तीन महिने सक्त मजुरी आणि आणि दोन हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका गावातील एका 16 वर्षीय बालिकेने 30 मे 2018 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार मिथुन दुधराम राठोड (24) हा युवक नेहमी तिचा पाठलाग करीत असे. या बालिकेने त्याला असे न करण्यास सांगितले आणि त्याला प्रतिसाद दिला नाही तेंव्हा तुला उचलून घेऊन जाईल अशी धमकी त्याने दिली. याबाबत ग्राम पंचायतमध्ये बालिकेने तक्रार केली. त्याबद्दल बैठक घेण्यात आली. याचा राग मनात धरुन 30 मे 2018 रोजी त्या युवकाने 16 वर्षीय बालिकेला उचलून नेले आणि बलात्कार करण्याची धमकी दिली. किनवट पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 109/2018 भारतीय दंड संहितेच्या 354(ड), 506 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल केला. किनवट पोलीसांनी मिथुन दुधराम राठोडला अटक केली आणि त्याच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्याचा विशेष पोक्सो सत्र खटला क्रमांक 5/2019 असा आहे.
न्यायालयात या प्रकरणी सहा साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. उपलब्ध पुराव्याच्या आधारे न्यायालयाने मिथुन राठोडला तीन महिने सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू ऍड.सौ.एम.ए.बत्तुला (डांगे) यांनी मांडली. किनवट येथील पोलीस अंमलदार बी.व्ही.महाजन आणि एस.एस.ढेंबरे यांनी पेरवी अधिकाऱ्यांची भुमिका पार पाडली.
अल्पवयीन बालिकेचा पाठलाग करणाऱ्या युवकाला सक्तमजुरी